- खुशालचंद बाहेती
मुंबई : १९१८ ते १९२० या कालावधीत देशात आलेली ‘बॉम्बे फिव्हर’ महामारीची दुसरी लाट सर्वाधिक घातक ठरली होती. या पार्श्वभूमीवर कोविड १९ ची फ्रान्स, युरोपसह जगात काही भागांत येणारी दुसरी लाट चिंता करण्यासारखीच आहे. त्यावेळी महात्मा गांधींनाही बॉम्बे फिव्हरची लागण झाली होती. या महामारीचा स्वातंत्र्य चळवळीवरही परिणाम झाला होता. जून १९१८ मध्ये जागतिक युद्धावरून परतणाऱ्या सैनिकांसोबत स्पॅनिश फिव्हरचे विषाणू भारतात आले. भारतात यांचा प्रवेश मुंबईतून झाल्यामुळे यास बॉम्बे फिव्हर नाव पडले. प्रथम बॉम्बे डॉक यार्ड येथे ड्यूटीवर असलेल्या पोलिसांना याची बाधा झाली. ज्यांच्यामध्ये लक्षणे दिसून आली त्या सैनिकांना क्वारंटाईन करण्यात आले. मात्र, Asymptomatic (लक्षणे न दिसणाऱ्या) असलेल्या सैनिकांच्या माध्यामातून ती मुंबई, मद्रास, पंजाब, कलकत्ता या प्रांतात व नंतर संपूर्ण देशात पसरली. पहिल्या लाटेत लहान मुले व वृद्धांना याची बाधा झाली. मृत्यूदरही सुरुवातीस कमी होता. सप्टेंबरमध्ये बॉम्बे फिव्हरची दुसरी लाटल आली. ही लाट अत्यंत तीव्र होती व यात सर्वाधिक प्राणहानी झाली. ही लाट नोव्हेंबरपर्यंत टिकून होती. १९१९ मध्ये पुन्हा तिसरी लाटही आली होती. या महामारीच्या नियंत्रणासाठी सार्वजनिक समारंभावर प्रतिबंध लावण्यात आले मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले. सुरुवातीच्या काळात लोकांनी याचे पालन केले. पहिली लाट कमी होताच लोकांनी सार्वजनिक समारंभात मोठ्या प्रमाणात सहभाग सुरू केला. मास्क वापरणे बंद केले. यानंतर काही दिवसांतच दुसरी लाट आली.
देशातील ५ टक्के लाेकांचा झाला होता मृत्यू- दुसऱ्या लाटेत २० ते ४० वयोगटातील सर्वाधिक बाधित. तरुण महिलांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीय.- महामारीत भारतात १ कोटी ३३ लक्ष ८८ हजार लोकांच्या मृत्यूचा अंदाज. जगभरात ३ कोटी मृत्यू. -भारतातील ५ टक्के लोकसंख्येचा बळी. - महामारीमुळे आले नपुंसकत्व आणि या तरुण महिलांचे मृत्यू यामुळे १९१९ चा जन्मदर पूर्वीच्या तुलनेत ३० टक्के कमी.
- लोकसंख्या वाढीचा दर 1.2% महामारीच्या परिणामामुळे १९११ ते १९२१ या दशकातील लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक कमी होता.