शतक महोत्सवी बाप्पा! मुंबई उपनगरातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कुठे सुरू झाला माहीत आहे?

By जयदीप दाभोळकर | Published: September 7, 2022 08:12 PM2022-09-07T20:12:47+5:302022-09-07T20:14:24+5:30

पण तुम्हाला माहितीये मुंबई उपनगरात सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव कुठे आणि कोणी साजरा केला? पाहूया या बद्दलचीच माहिती.

100 years of ganeshotsav Do you know where the first public Ganeshotsav started in the suburbs of Mumbai Saraswati Baugh | शतक महोत्सवी बाप्पा! मुंबई उपनगरातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कुठे सुरू झाला माहीत आहे?

शतक महोत्सवी बाप्पा! मुंबई उपनगरातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कुठे सुरू झाला माहीत आहे?

Next

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. मुंबई म्हणजेच मुख्य मुंबईत त्याच वर्षी गिरगावात केशवजी नाईक या चाळीत सार्वजनिक गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. १९९२ मध्ये या मडळानं आपलं शताब्दी वर्ष साजरं केलं. पण तुम्हाला माहितीये मुंबई उपनगरात सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव कुठे आणि कोणी साजरा केला? पाहूया या बद्दलचीच माहिती.
 
“१९२३ मध्ये जोगेश्वरी येथे सरस्वती बाग गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. पारतंत्र्याच्या कालखंडाची गरज ओळखून समाज प्रबोधन करण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रचार व प्रसार केला. याच उद्देशाने या मंडळाची स्थापना देखील झाली आणि हेच ते मुंबई उपनगरातील सर्वात पहिले गणेशोत्सव मंडळ. ह्या वर्षी सरस्वती बाग गणेशोत्सव मंडळानं १०० व्या वर्षात पदार्पण केलं आहे,” अशी माहिती मंडळाचे कार्यकर्ते जयेश कामत यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

महाराष्ट्राचे लाडके आणि आदरणीय व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांचं बालपणसुद्धा याच सरस्वती बागेमध्ये गेलं. येथील गणेशोत्सवामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे आपल्यातील कलागुणांना प्रोत्साहन मिळालं असं पुलंनी 'बालपणीचा काळ सुखाचा' या आपल्या लेखामध्येही नमूद केलंय. आपल्या आयुष्यातील पहिले नाटक याच सोसायटीमधील गणेशोत्सवामध्ये पाहिल्याचे पु.ल.आवर्जून सांगतात. गणेशोत्सवामध्ये इथल्या स्थानिक रहिवाशांनी सादर केलेल्या विविध कलांबद्दलच्या अनेक आठवणी त्यांनी आपल्या लेखात जागवल्या आहेत. पु.ल. देशपांडे यांच्याप्रमाणे अनेक दिग्गज या सोसायटीमध्ये राहत असत आणि या गणेशोत्सवात सहभागी होत असत. ॲडमिरल जयंत नाडकर्णी, कला समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी, कादंबरीकार वसंत फेणे, ट्रेड युनियन लीडर कॉम्रेड बी.एस.धुमे, रा.स्व.संघाचे कार्यकर्ते भास्करराव मुंडले, उद्योजक सतीश वाघ ही त्यातील काही नावं आहेत.

सोसायटीमधील सर्व वयोगटातील कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम या गणेशोत्सव मंडळाद्वारे करण्यात येतं. याशिवाय किशोरीताई आमोणकर, अजित कडकडे, प्रसाद सावकार, हृदयनाथ मंगेशकर अशा अनेक दिग्गजांच्या मैफली येथे श्रीगणेशाचरणी रंगल्या आहेत. विविध व्यावसायिक नाटकांचे प्रयोगसुद्धा श्रीगणेशाचरणी झाले आहेत.

१०० वर्षांपूर्वी हा गणेशोत्सव ज्या उत्साहाने सुरू झाला होता, तेवढ्याच जोमाने आज सुद्धा नवीन पिढी हा उत्सव दणक्यात साजरा करत आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्याचं आचरण हे मंडळ गेली १०० वर्षे अविरतपणे करत आहे. उत्सवाला कुठलंही व्यावसायिक स्वरूप येऊ न देता आजसुद्धा हा सार्वजनिक उत्सव घरगुती वातावरणात आत्मियतेच्या भावनेने साजरा केला जातो. दरवर्षी २ ते ३ फुटांची शाडूची श्रींची मूर्ती, त्याची सजावटसुद्धा पर्यावरणपूरक साहित्य वापरूनच केली जाते. यादरम्यान, सामाजिक प्रबोधन करणारे कार्यक्रम केले जातात. शासनातर्फे आता पर्यावरण स्नेही गणेशोत्सव स्पर्धा घेतली जाते, २०१८ सालचा गृहनिर्माण संस्था या गटामध्ये प्रथम पुरस्कार सरस्वती बाग गणेशोत्सव मंडळाला मिळाला आहे. या सरस्वती बागेतील बाप्पाचा विसर्जन सोहळा देखील अद्वितीय असतो. सोसायटीच्या आवारात मिरवणूक फिरवून झाली की नंतर सोसायटीच्या एका टोकाला असलेल्या जुन्या विहिरीमध्ये बाप्पाचे विसर्जन होते व पुढच्या वर्षी लवकर या, या घोषामध्ये टाळ मृदुंगाच्या भजनाच्या तालात बाप्पाला निरोप दिला जातो आणि सर्वांना आनंदी ठेवण्यासाठी आशीर्वाद मागितला जातो. या शतकी वर्षामध्ये विविध स्वरूपाचे सामाजिक कार्यक्रम करण्याचा मंडळाचा मानस असल्याचे जयेश कामत यांनी सांगितलं.

Web Title: 100 years of ganeshotsav Do you know where the first public Ganeshotsav started in the suburbs of Mumbai Saraswati Baugh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.