Join us

भारतीय स्टेट बँकेला १,००० कोटींचा गंडा; सात जणांवर गुन्हा दाखल, सीबीआयची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 2:01 PM

या प्रकरणी कंपनीचे अध्यक्ष राजेश पोद्दार, संचालक राजेश अगरवाल, संजय बन्सल, अंजू पोद्दार, मनीष गर्ग यांच्यासह अन्य तीन जणांविरोधात सीबीआयने  गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : स्टील निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या रायगड जिल्ह्यातील लोहा इस्पात या कंपनीने स्टेट बँक प्रणित पाच कर्जदार बँकांना १,०१७ कोटी ९३ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कंपनीचे अध्यक्ष राजेश पोद्दार, संचालक राजेश अगरवाल, संजय बन्सल, अंजू पोद्दार, मनीष गर्ग यांच्यासह अन्य तीन जणांविरोधात सीबीआयने  गुन्हा दाखल केला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, २०१२ ते २०१७ या कालावधीमध्ये कंपनीने स्टेट बँक प्रणित पाच बँकांकडून खेळते भांडवल, मुदत कर्ज आदी कारणांसाठी एकूण ८१२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, कंपनीने कर्जापोटी प्राप्त रक्कम बनावट पद्धतीने व्यवहार करत लंपास केल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे. या पद्धतीने कंपनीने पैसे लाटले आणि दुसरीकडे कंपनी आजारी असल्याचे दाखवत, या बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कंपनीने केली नाही. यामुळे या सर्व बँकांची एकूण १,०१७ कोटी ९३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. 

फोरेन्सिक ऑडिटद्वारे कंपनीने मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याची बाब उजेडात आली. त्यानंतर, कंपनीचे कर्ज खाते थकीत कर्ज खाते व कालांतराने ‘फ्रॉड’ खाते म्हणून घोषित करण्यात आले. या प्रकरणी राष्ट्रीय कंपनी विधि प्राधिकरणातही (एनसीएलटी) दाद मागण्यात आली होती. या प्राधिकरणाने कंपनीच्या दिवाळखोरीचा निकाल देत, त्यावर प्रशासकाची नेमणूक केली आहे.

 

टॅग्स :एसबीआयधोकेबाजीगुन्हा अन्वेषण विभाग