मुंबई - शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना काही महिन्यांपूर्वीच पत्रा चाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर, ईडीकडून त्यांना अटकही करण्यात आली. सध्या ते जामीनावर बाहेर असून निवडणुकांच्या रणधुमाळीत ते महाविकास आघाडीकडून महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंजेबासोबत केल्याने भाजपा समर्थकांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला होता. आता, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन महाराष्ट्रात १ हजार कोटींचा वाईन स्कॅम झाल्याचा आरोप केला आहे.
दिल्ली सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली असून दिल्ली मद्य धोरणात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी, ईडीने यापूर्वीच दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक केली होती. त्यामुळे, दिल्ली मद्य धोरण सध्या देशभरत गाजत आहे. त्यातच, अरविंद केजरीवाल हे दिल्लीतील तुरुंगातून कामकाज पाहत आहेत, लोकसभा निवडणुकांचे निर्णय घेत आहेत. सध्या देशात सर्वात लोकप्रिय नेते ते आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. दुसरीकडे महाराष्ट्र वाईन धोरण राबवून १००० कोटींचा स्कॅम करण्यात आल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी संजय राऊत यांची कन्या वाईन कंपनीच्या संचालकपदी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
१६ एप्रिल २०२१ रोजी संजय राऊत यांची मुलगी वाइन किंग अशोक गर्ग मॅग्पी DFS Pvt Ltd या कंपनीच्या संचालक झाल्या. तर, २६ एप्रिल २०२१ रोजी राज्यातील तत्कालीन ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील वाइन धोरणात सुधारणा करून वाइनला मद्यविरहित मानून आणि किरकोळ दुकाने, सुपर मार्केटमध्ये विक्री करण्यास परवानगी दिली होती. हा तब्बल १००० कोटींचा वाईन घोटाळा असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांनी ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील काही कागदपत्रेही शेअर केली आहेत. त्यामध्ये, राऊत यांची कन्या पूर्वशी संजय राऊत यांचं नाव आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते आमने सामने आले आहेत. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप आणि टीका करण्यात येत आहे. शिवसेना उबाठाकडून संजय राऊत तिखट शब्दात भाजपावर हल्लाबोल करत आहेत. तर, भाजपा नेत्यांकडून आम्ही संजय राऊतांना महत्त्व देत नाही, असे प्रतिवाद केला जातो. मात्र, आता किरीट सोमय्या यांनी १ हजार कोटींचा गंभीर आरोप राऊत यांच्यावर केला आहे. दुसरीकडे ईडीने आजच शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या संपत्तीवर धाड टाकून झाडाझडती घेतली आहे.