मुंबई : पावसाळ्यात जागोजागी होणारी रस्त्यांची चाळण आणि त्यामुळे पडणारे खड्डे हा कायम चर्चेचा विषय असतो. पावसाळ्यातील याच खड्ड्यांनी गेल्या पाच वर्षांत तब्बल १०१७ बळी घेतले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयातर्फे अलीकडेच जारी करण्यात आलेल्या अहवालात २०१७ ते २०२१ या पाच वर्षांत राज्यात पावसाळ्यात झालेल्या ८ हजार अपघातांनी ३१६७ बळी घेतल्याची नोंद आहे.
पावसाळ्यात वाहन चालवणे वाहनचालकांसाठी जिकिरीचे ठरते. कारण रस्त्यांची दुर्दशा झालेली असते. यासंदर्भात बोलताना सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या सार्वजनिक धोरण आणि संशोधन संचालक करुणा रैना म्हणाल्या की, पावसाळ्यात रस्त्यांची स्थिती वाईट असते. सतत जड वाहतूक, पाणी साचणे, गळती आणि सदोष ड्रेनेज यांमुळे, रस्त्यांची प्रचंड झीज होते, त्यामुळे खड्डे पडतात. पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांनी मोटार वाहन कायदा २०१९ च्या कलम १९८ अ ची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यानुसार अपघातास रस्त्यांचे निर्माणकर्ते, अभियंते आणि कंत्राटदार तसेच इतर संबंधितांना जबाबदार धरले जाते, असे रैना यांनी स्पष्ट केले.
वेळेवर सर्व्हिसिंग करा
पावसाळ्यात वाहनांची वेळेवर सर्व्हिसिंग करावी, दृश्यमानता कमी असल्याने हेडलाइट, टेललाइट आणि इंडिकेटर तपासून घ्यावे, वायपर तपासावे, गाडीचे ब्रेक नीट असणे गरजेचे आहे. टायरमधील हवेचा दाब किती, तसेच ट्रेड डेप्थ व स्टेपनी यांचीही वेळच्या वेळी तपासणी वाहनचालकांनी करावी. तसेच वाहन चालवताना पुढील वाहन व स्वत: चे वाहन यात योग्य अंतर असावे. - भरत कळसकर, उपायुक्त, रस्ता सुरक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य
वाहन हळू चालवा
पावसाळ्यात अनेकदा ब्रेक स्किड होतात. त्यामुळे वाहन हळू चालवावे. टायर उत्तम स्थितीत असणे खूप जास्त गरजेचे आहे. अन्यथा ब्रेक दाबल्यानंतर मोटार घसरते. त्यामुळे टायर खराब असल्यास अपघाताचा धोका वाढतो. पावसाळ्यात शहरांपेक्षा ग्रामीण भागात जास्त अपघात होतात, त्यामुळे वाहनचालकांनी काळजी घ्यावी. - डॉ. शंकर विश्वनाथ, वाहतूकतज्ज्ञ