मुंबई : राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी तातडीची बैठक बोलवली होती. राज्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना ॲक्शन मोडवर राबवाव्यात, असे निर्देश या बैठकीत त्यांनी दिले.
मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेली बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यामुळे धुळीचे साम्राज्य पसरू नये म्हणून पाण्याची फवारणी करून रस्ते स्वच्छ करावेत, त्याचबरोबर साचलेली धूळ साफ करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. रस्ते धुण्यासाठी टँकरची संख्या १,००० पर्यंत वाढवावी, असेही त्यांनी सांगितले.
वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी आदी उपस्थित होते.
हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करा सर्व महापालिका, शहरांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आणि मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करतानाच शहरातील सर्वाधिक प्रदूषण होणाऱ्या ठिकाणांवर संनियंत्रण करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वाहनांमधून रस्त्यांवरील माती, डेब्रिज वाहून नेताना ती झाकून वाहतूक करावी तसे न करणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
मुंबईत क्लाऊड सीडिंग राज्यातील महानगरांमध्ये नागरी वनक्षेत्र (मियावाकी) वाढविण्यासाठी महापालिकांनी पुढाकार घ्यावा. मुंबईमधील धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाऊड सिडिंगचा प्रयोग करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यातील प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा दर आठवड्याला आढावा सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.