मेळाव्याला येणाऱ्यास प्रत्येकी १ हजार, आत्तापर्यंत ५२ कोटी वाटले; खैरेंचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 11:32 AM2022-10-05T11:32:53+5:302022-10-05T11:33:46+5:30
चंद्रकांत खैरे गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाच्या नेत्यांवर सडकून टिका करत आहेत.
औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेतून शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री आता मुंबईला रवाना झाले आहेत. तर, ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व चंद्रकां खैरे हेही दसरा मेळाव्यासाठी येत आहेत. तत्पूर्वी विमानतळावर माध्यमांनी दोन्ही गटातील नेत्यांशी संवाद साधला. दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. मात्र, शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याला येणाऱ्यास प्रत्येकी १ हजार रुपये देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
चंद्रकांत खैरे गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाच्या नेत्यांवर सडकून टिका करत आहेत. खरी शिवसेना आमचीच असल्याचे सांगत मुख्यमंत्री आणि औरंगाबादेतील शिंदे गटाच्या नेत्यांवर ते हल्लाबोल करत आहेत. त्यांसोबत, अंबादास दानवे हेही शिवसेनेची बाजू मांडत शिंदे गटला लक्ष्य करत आहेत.
दसरा मेळाव्यासाठी पैसे देऊन शिंदे गटाचे आमदार गर्दी जमवत असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये शिंदे गटाचे आमदार देत असून त्यासाठी 52 कोटी रुपये त्यांनी खर्च केलेत अशी माहिती चंद्रकांत खैरे यांनी यावेळी दिली आहे.
शिंदे गटाचे आमदार हे गद्दार आहेत, या गद्दारांची शिवसैनिकांशी बरोबरी होऊ शकत नाही, असेही खैरेंनी म्हटले. औरंगाबादेतून दसरा मेळाव्याला निघण्यापूर्वी खैरे आणि अंबादास दानवे यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा साधला. मुंबईला निघण्यापूर्वी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दावने यांनी कर्णपुरा देवीची प्रार्थना केली.
काय म्हणाले दानवे
गद्दारीच्या पिकाचा नायनाट करण्यासाठी आम्ही देवीकडे प्रार्थना केली आहे. उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभेतून महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट येईल. दसरा मेळावा ऐतिहासिक असतो, महाराष्ट्रात शिवाजी पार्कवरुनच विचाराचं सोनं लुटलं जातं असे दानवे यांनी म्हटले आहे.