मुंबईतील रस्ते धुण्यासाठी १००० पाण्याचे टँकर्स, मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना; 'वर्षा'वर बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 03:27 PM2023-11-09T15:27:09+5:302023-11-09T15:28:35+5:30
मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टानं मनपा प्रशासनाला कठोर इशारा दिल्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'वर्षा' निवासस्थानी प्रदूषण नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली.
मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टानं मनपा प्रशासनाला कठोर इशारा दिल्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'वर्षा' निवासस्थानी प्रदूषण नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासनाला काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. मुंबईतील रस्त्यांवरील धूळ आणि माती उडू नये यासाठी १००० पाण्याचे टँकर्स भाडेतत्वावर घेतले जाणार असून रस्ते धुतले जाणार आहेत. रस्ते धुण्यासाठी पिण्याचं पाणी न वापरता पुर्नवापर केलं जाणारं पाणी वापरलं जाईल, असंही शिंदेंनी यावेळी सांगितलं. बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
मुंबईतील वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं केलं जाईल. प्रदूषण नियंत्रण ही पालिकेची जबाबदारी तर आहेच, पण ही एक लोक चळवळ झाली पाहिजे, असं शिंदे म्हणाले. यासोबतच अर्बन फॉरेस्ट संकल्पनेवर भर देण्याच्याही सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. "प्रदूषणाचं प्रमाण युद्ध पातळीवर कमी झालं पाहिजे यासाठीच्या सर्व सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुंबईतील रस्ते धुण्यासाठी १ हजार पाण्याचे टँकर्स भाडे तत्त्वार घेतले जाणार आहेत. तसंच बांधकामाच्या ठिकाणी स्मॉगगन आणि स्प्रिंकलर्स बसवण्याचे आदेश दिले गेले आहेत. हायकोर्टानं दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन केलं जाईल", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
माती, डेब्रीज वाहून नेताना ती झाकून न्यावी
सर्व महापालिका, शहरांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आणि मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करतानाच शहरातील सर्वाधिक प्रदुषण होणारी ठिकाणांवर संनियंत्रण करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वाहनांमधून रस्त्यांवरील माती, डेब्रीज वाहून नेताना ती झाकून वाहतूक करावी तसे न करणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
अर्बन फॉरेस्ट वाढवावे
राज्यातील महानगरांमध्ये नागरी वन क्षेत्र (मियावाकी) वाढविण्यासाठी महापालिकांनी पुढाकार घ्यावा. मेडन मध्ये वृक्षारोपण करावे. धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी स्प्रिंकलर्सचा वापर करा. हवेतील प्रदुषणावर उपाययोजना करताना संनियंत्रण करणे आवश्यक आहे. मुंबईमधील धुळाचे प्रदुषण कमी करण्यासाठी क्लाऊड सिंडींगचा प्रयोग करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
प्रदुषण नियंत्रण उपाययोजनांचा दर आठवड्याला आढावा सादर करा
राज्यातील प्रदुषण नियंत्रण उपाययोजनांचा दर आठवड्याला आढावा सादर करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यावेळी आयआयटीच्या तज्ञांनी प्रदुषण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. प्रदुषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी या तज्ञांनी केले.