Join us  

शाब्दिक बाचाबाची केली म्हणून १० हजार दंड

By जयंत होवाळ | Published: June 28, 2024 7:04 PM

पालिकेच्या एफ- उत्तर विभागात अमित आव्हाड सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सहकर्मचाऱ्यासोबत शाब्दिक बाचाबाची झाली म्हणून प्रभारी सुरक्षा आयुक्तांनी सुरक्षा रक्षकाला थेट १० हजार रुपयांचा दंड आकारला , इतकेच नव्हे तर त्याच्या वेतनातून दंडाची रक्कम कापून घेतल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराविरोधात म्युनिसिपल कर्मचारी युनियनने मुंबई महापालिकेच्या उद्याने व सुरक्षा विभागाचे उपायुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे.

पालिकेच्या एफ- उत्तर विभागात अमित आव्हाड सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या १७ वर्षांच्या सेवेत त्यांच्याविषयी कोणतीही तक्रार नाही. ना कधी त्यांना मेमो देण्यात आला. कामावर असताना आव्हाड यांची सहकर्मचाऱ्यासोबत शाब्दिक बाचाबाची झाली . त्यावर त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यांच्या वेतनातून ही रक्कम कापूनही घेण्यात अली.

आव्हाड यांच्या विषयी पूर्ण सेवेत पहिली तक्रार असल्याने त्यांना समज देऊन सोडून द्यावे, अशी विनंती युनियनने केली होती. या शक्षेच्या विरोधात आव्हाड यांनी अपील अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यावर अद्याप कोणती कार्यवाही केली हे कळवण्यात आलेले नाही, असे युनियनचे उपाध्यक्ष संजय कांबळे यांनी सांगितले.