Join us  

राज्यातील निवासी डॉक्टरांचा नियोजित संप मागे, विद्यावेतनात १० हजाराची भरीव वाढ

By संतोष आंधळे | Published: February 07, 2024 9:23 PM

राज्यातील वैद्यकीय महाविद्यलयातील निवासी डॉक्टरांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बुधवारी झालेल्या बैठकीनंतर नियोजित संप मागे घेतला.

मुंबई : राज्यातील वैद्यकीय महाविद्यलयातील निवासी डॉक्टरांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बुधवारी झालेल्या बैठकीनंतर नियोजित संप मागे घेतला. निवासी डॉक्टरांनी बुधवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यापूर्वीच  निवासी डॉक्टर संघटनांचे प्रतिनिधी सोबत झालेल्या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्रीनी दिल्यामुळे हा संप मागे घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात राज्यातील निवासी डॉक्टर संघटना ( मार्ड )यांच्या  मागण्यांसंदर्भात बैठक झाली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, तसेच  मार्ड संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या काही वर्षपासून मार्ड, नवे वसतिगृह बांधा, तसेच आहे त्या वसतिगृहाची डागडुजी करा , विद्यावेतन केंद्रीय आरोग्य संस्थाप्रमाणे करा, तसेच ते वेळेत द्या  याकरिता सातत्याने शासनाकडे मागणी करत आहेत. मात्र त्यांच्या मागण्याना यश येत नव्हते. त्यामुळे अंतिम त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांना भेटून आपल्या मागण्या सांगितल्या. मार्डच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत विद्यावेतन वाढीची आणि वेळेत देण्याची मागणी मान्य केली. तसेच वसतिगृह तातडीने दुरुस्त करणार असल्याचे डॉक्टरांना यावेळी सांगितले.

सध्याच्या घडीला निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन ८० हजाराच्या जवळपास आहेत. त्यामध्ये १० हजाराची भर पडल्याने त्याचे विद्यावेतन ९० हजारच्या घरात जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :डॉक्टरसंपअजित पवार