- मनोज मोघेमुंबई : शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतल्यानंतर त्यापाठोपाठ आता घरेलू कामगरांनाही सरकारने खुशखबर दिली आहे. या निर्णयानुसार ५५ वर्षे पूर्ण झालेल्या घरेलू कामगारांच्या खात्यावर १० हजार रुपये जमा होणार आहेत. पण, या निर्णयाचा लाभ केवळ ३० टक्केच कामगारांना होणार असून, ७० टक्के महिला वंचित राहणार आहेत.
आघाडी सरकारच्या काळात २०१४-१५ साली महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यावर्षी नोंदणी झालेल्या घरेलू कामगारांच्या खात्यात १० हजार रुपये जमाही करण्यात आले. मात्र, त्यानंतर सरकार बदलले शिवसेना-भाजप युती सरकार आले आणि या निर्णयाची अंमलबजावणी तब्बल आठ वर्षे झाली नव्हती. २०१७ साली ३ लाख ८० हजार घरेलू कामगारांची नोंदणी या मंडळात झाली हाेती. मात्र, २०२० पासून कोरोना सुरू झाल्याने दरवर्षी करावी लागणारी ही नोंदणी होऊ शकली नाही. जुनी नोंदणी रद्द झाल्याने ७० टक्के महिला लाभापासून वंचित राहतील.