21 हजार नागरिकांसह 10 हजार विद्यार्थ्यांनी दिली नौदलाच्या युद्धनौकेला भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 08:00 PM2019-09-23T20:00:00+5:302019-09-23T20:02:41+5:30
युध्दनौकेवरील शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे, अग्निहत्यारे, अभियांत्रिकी व इलेक्ट्रिक पध्दत, पाणबुड्यांची उपकरणे व वैद्यकीय सेवा या सर्वबाबत नौदलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
मुंबई - नौदल सप्ताहानिमित्त सर्वसामान्य नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना युद्धनौका पाहण्याची संधी भारतीय नौदलाने उपलब्ध करुन दिली होती. त्याचा लाभ उठवत 21 हजार सर्वसामान्य नागरिक व 10 हजार शालेय विद्यार्थ्यांनी युद्धनौका व विनाशिका पाहण्याची व नौदलाच्या कामकाजाला जाणून घेण्याची संधी साधली. नौदलाच्या पश्चिम विभागातर्फे नौदल सप्ताहानिमित्त याचे आयोजन करण्यात आले होते. 15 व 22 सप्टेंबरला युद्धनौका सामान्य नागरिकांसाठी तर 21 सप्टेंबर रोजी केवळ शालेय विद्यार्थ्यांसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या.
15 सप्टेंबरला 7 हजार नागरिकांनी युद्धनौकेला भेट दिली व नौदलाच्या ताफ्यातील विनाशिका आयएनएस मुंबई व युद्धनौकेची सफर केली. 22 सप्टेंबरला 14 हजार नागरिकांनी आयएनएस तलवार व आयएनएस गोमतीला भेट दिली. 21 सप्टेंबर ला मुंबई परिसरातील दोनशेहून अधिक शाळांमधील 10 हजार विद्यार्थ्यांनी आयएनएस तलवार व आयएनएस ब्रम्हपुत्राला भेट दिली. युद्धनौकेवरील शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे, अग्निहत्यारे, अभियांत्रिकी व इलेक्ट्रिक पध्दत, पाणबुड्यांची उपकरणे व वैद्यकीय सेवा या सर्वबाबत नौदलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.