Join us

राणीच्या बागेत एका दिवसात १० हजार पर्यटक, पावणेचार लाखांचा महसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 13:52 IST

ख्रिसमसची सुट्टी साधून मुलांसह पालकांनी घेतला आनंद

मुंबई : 'स्वप्नात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग,' अशी राणीच्या बागेसंदर्भातील भावना प्रत्येक लहान मुलाच्या मनात असते. बुधवारी नियमित सुट्टी असूनही नाताळनिमित्त ही बाग पर्यटकांसाठी खुली ठेवण्यात आली होती. त्यामुळे सकाळपासूनच बच्चे कंपनी आणि पर्यटकांनी या बागेत तोबा गर्दी केली. दिवसभरात १० हजारांपेक्षा अधिक पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे सुमारे पावणेचार लाखांची तिकीट विक्री झाल्याची माहिती जिजामाता प्राणी संग्रहालय प्रशासनाने दिली.

बिबट्याचे आकर्षण 

भायखळा येथील जिजामाता प्राणी संग्रहालय अर्थात राणीच्या बागेत बुधवारी सकाळपासूनच लहान मुले आणि त्यांच्या पालकांनी गर्दी करायला सुरुवात केली. तिकिटासाठी रांगा लागल्या होत्या, तर प्रशासनाने स्वतः तिकीट काढण्यासाठी केलेल्या उपाययोजनेचाही पर्यटक लाभ घेत होते.

राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटक आणि लहान मुलांना भव्य प्राणी पाहायला आवडतात. त्यामुळे इथल्या बिबट्या, पाणघोडा आणि अस्वलाच्या पिंजऱ्यासमोर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. लगतच्या पक्ष्यांच्या पिंजऱ्याकडेही बालगोपाळ आनंदाने धाव घेत होते. हरीण, नीलगाय आणि चितळ हे प्राणीसुद्धा पर्यटकांचे आकर्षण ठरत होते.

माझ्या मुलांना राणीची बाग म्हणजे नेहमीच आकर्षण वाटते. गेल्या काही वर्षांपासून आम्ही राणीच्या बागेत येतो. मात्र, हत्ती आता राणीच्या बागेत नाही आणि सिंह, लांडगा येणार आहे, असे फलक काही महिन्यांपासून तसेच आहेत. त्यामुळे मुलांचा हिरमोड होत आहे, याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे - मीनल पोखरकर

मुलांना सुट्टी म्हटलं की, थेट राणीची बाग आठवते. मुंबईत एवढे एकच प्राणिसंग्रहालय असल्यामुळे मोबाइलच्या जगातून काही वेळ मुलांना बाहेर काढता येते. प्रत्यक्ष प्राण्यांची ओळख त्यांना करून देता येते. तसेच हा परिसर मोठा असल्याने मुलांना मनसोक्त खेळता येते. त्यामुळे आम्ही वारंवार येत असतो -रूपेश लाड

राणीच्या बागेला बुधवारी नियमित सुट्टी असते. मात्र, नाताळनिमित्त आम्ही आज बाग खुली ठेवली होती. पर्यटकांनीही त्याला उदंड प्रतिसाद दिला असून दिवसभरात १०,४११ पर्यटकांची नोंद झाली. तर ३,७४,१५० रुपयांची तिकीट विक्री झाली. राणीची बाग स्वच्छ ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो, तसेच नवीन प्राणी आणण्यासाठी वरिष्ठस्तरावर प्रयत्न सुरू आहेत - अभिषेक साटम, अधिकारी, जिजामाता प्राणीसंग्रहालय

टॅग्स :मुंबईराणी बगीचा