दोन अध्यक्षांच्या वादात रखडले शंभरावे नाट्यसंमेलन; १२ एप्रिलच्या सुनावणीकडे लागले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 07:27 AM2022-03-26T07:27:27+5:302022-03-26T07:27:40+5:30

नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाचा तिढा आता धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित

100th Natya Sammelan is embroiled in a dispute between the two presidents | दोन अध्यक्षांच्या वादात रखडले शंभरावे नाट्यसंमेलन; १२ एप्रिलच्या सुनावणीकडे लागले लक्ष

दोन अध्यक्षांच्या वादात रखडले शंभरावे नाट्यसंमेलन; १२ एप्रिलच्या सुनावणीकडे लागले लक्ष

Next

- संजय घावरे

मुंबई : तीन वर्षांपूर्वी मुलूंडमध्ये झालेल्या ९९ व्या नाट्यसंमेलनानंतर शंभरावे नाट्यसंमेलन कधी होणार हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रसाद कांबळी असले, तरी नियामक मंडळाने नरेश गडेकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. त्यामुळे झालेला नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाचा तिढा आता धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित आहे. त्याचा फटका नाट्यसंमेलनाच्या आयोजनाला बसला आहे. 

राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वीच शंभराव्या नाट्यसंमेलनासाठी १० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती पण नंतर आलेल्या कोरोनामुळे नाट्यसंमेलन होऊ शकले नाही. त्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळात फूट पडली. 

या सगळ्यात नाट्यसंमेलनाचा मुहूर्त हुकला तो हुकलाच. आता कोरोनाचे निर्बंध शिथील झाले असून सगळे व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळेच नाट्यरसिकांना शंभराव्या नाट्यसंमेलनाचे वेध लागले आहेत. धर्मादाय आयुक्त १२ एप्रिलला होणाऱ्या सुनावणीत काय निकाल देतात यावर अध्यक्षपदाचे भवितव्य ठरेल. या विषयावर आपल्याला काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असे निर्माते प्रसाद कांबळी यांनी स्पष्ट केले. 

नियामक मंडळात वाद निर्माण झाल्यावर विश्वस्त जे निर्णय देतील तो दोन्ही पक्षांना बंधनकारक असेल, असे नाट्यपरिषदेच्या घटनेत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार दोन्ही पक्षांचे म्हणणे विश्वस्त शरद पवार यांनी ऐकले. तसेच, नियामक मंडळाने नरेश गडेकरांना ‘हंगामी अध्यक्ष’ म्हणून घोषित केले आणि  धर्मादाय आयुक्तांकडे चेंज ऑफ रिपोर्ट सादर करण्यात आला होता, अशी माहिती परिषदेशी निगडित पदाधिकाऱ्याने दिली.

जून किंवा ऑक्टोबरमध्ये मोठ्या थाटात आयोजन
हंगामी अध्यक्ष नरेश गडेकर यांनी वादांचे ढग दूर झाल्यावर नाट्यसंमेलन होईल, असे स्पष्ट केले. राज्य सरकारने निधी दिला असला तरी नाट्यसंमेलनाची आखणी करण्यासाठी पुरेसा वेळ आवश्यक आहे.
आयुक्तांनी दिलेल्या पुढील तारखेनंतर शक्य झाल्यास जून किंवा पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये शंभरावे नाट्यसंमेलन मोठ्या थाटात होईल. 
कामकाज करण्याच्या पद्धतीवरून जरी आमच्यात मतभेद असले तरी वैयक्तिक मतभेद नाहीत. त्यामुळे लवकरच सर्वजण एकत्र येऊन शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या तयारीला लागू, अशी भूमिका गडेकर यांनी मांडली.

Web Title: 100th Natya Sammelan is embroiled in a dispute between the two presidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.