मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नियामक मंडळ व विश्वस्त व्हावा. मंडळाची संयुक्त सभा शुक्रवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. या सभेत १०० वे नाट्य संमेलन पुढील वर्षी घेण्यास मंजुरी देण्यात आली. संमेलनाच्या अध्यक्षपदी जब्बार पटेलच कायम राहणार आहेत.
नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व विश्वस्त उद्योग मंत्री उदय सामंत, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, शशी प्रभू, गिरीश गांधी, अशोक हांडे, मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. यावेळी पवार म्हणाले की, नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित नियामक मंडळ व कार्यकारी समितीने हाती घेतलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल दुरुस्तीच्या कामात विश्वस्त मंडळ सर्वोतोपरी मदत करेल. शंभरावे नाट्य संमेलन विभागीय पातळीवर घेण्यात यावे आणि मुख्य कार्यक्रम मध्यवर्ती ठिकाणी साजरा व्हावा.
प्रशांत दामले यांनी यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलाच्या नूतनीकरणाचा अहवाल सादर केला. उर्वरित कामांसाठी पुढाकार घेऊन लवकर नाट्य संकुल प्रेक्षकांसाठी खुले होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाट्य परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून पुढील काळात परिषदेच्या शाखांचे सक्षमीकरण करण्यात यावे, तसेच वेगात सुरू असलेल्या नाट्य संकुलाच्या दुरूस्तीच्या कामात शासनही सहकार्य करेल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. कोषाध्यक्ष सतीश लोटके यांनी दुरुस्ती खर्चाचा अहवाल सादर केला. प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी शंभराव्या नाट्यसंमेलनाविषयी आलेल्या सूचना सभेसमोर मांडल्या. संमेलनाची रूपरेषा लवकरच आखण्यात येणार आहे.