पुण्यात १०१ किलो अंमली पदार्थ जप्त; पाच जणांना अटक, डीआरआयची कारवाई
By मनोज गडनीस | Published: August 25, 2023 09:02 PM2023-08-25T21:02:06+5:302023-08-25T21:02:24+5:30
या प्रकरणी अटक करण्यात आलेले पाच लोक महाराष्ट्र, तेलंगणा, दिल्ली, हैदराबाद येथील रहिवासी असून ते आंतरराज्यीय रॅकेट चालवत असल्याचा डीआरआयला संशय आहे.
मुंबई - केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी पुण्यातून तब्बल १०१ किलो वजनाचा अंमली पदार्थाचा साठा एका वाहनातून जप्त केला असून याची किंमत ५० कोटी ६५ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणा येथून महाराष्ट्रात येणाऱ्या एका वाहनात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. तेलंगणा राज्याची वाहन नोंदणी असलेले हे वाहन पुण्यात आले त्यावेळी अधिकाऱ्यांनी ते थांबवत त्याची झडती घेतली असता त्यामध्ये एक मोठे पिंप आढळून आले. त्या पिंपामध्ये हा अंमली पर्दाथांचा साठा ठेवण्यात आला होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेले पाच लोक महाराष्ट्र, तेलंगणा, दिल्ली, हैदराबाद येथील रहिवासी असून ते आंतरराज्यीय रॅकेट चालवत असल्याचा डीआरआयला संशय आहे.