१०२ उपेक्षित, अपंग अडकणार विवाहबंधनात
By admin | Published: May 23, 2016 03:29 AM2016-05-23T03:29:42+5:302016-05-23T03:29:42+5:30
आर्थिकदृष्ट्या उपेक्षित आणि शारीरिक अपंगत्व वाट्याला आलेल्यांना जीवनसाथी मिळवून देण्याचा अभिनव उपक्रम नारायण सेवा संस्थानने सुरू केला आहे
मुंबई : आर्थिकदृष्ट्या उपेक्षित आणि शारीरिक अपंगत्व वाट्याला आलेल्यांना जीवनसाथी मिळवून देण्याचा अभिनव उपक्रम नारायण सेवा संस्थानने सुरू केला आहे. त्याअंतर्गत संस्थेच्या वतीने तब्बल ५१ जोडप्यांना विवाहबंधनात अडकवण्यात येणार आहे. गोरेगाव पूर्वेकडील बॉम्बे कन्व्हेन्शन अॅण्ड एक्झिबिशन सेंटरमध्ये रविवारी, २९ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हा विवाह सोहळा पार पडणार आहे.
या विवाह सोहळ्यात जोडप्यांकडून लग्न समारंभासाठी एकही रुपया घेण्यात आलेला नाही. विवाहाचा संपूर्ण खर्च संस्था उचलणार असल्याचे संस्थेचे विश्वस्त देवेंद्र चोबीसा यांनी सांगितले. ते म्हणाले की, एकूण ५१ जोडप्यांपैकी २२ जोडप्यांमधले दोन्ही जोडीदार हे शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत, तर ७ जोडप्यांमध्ये प्रत्येकी एक जोडीदार शारीरिकदृष्ट्या अपंग आहे; शिवाय २२ जोडपी ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. विवाहबद्ध होणारी जोडपी ही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील असल्याचे संस्थेने सांगितले. जोडप्यांमधील काही जण आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. तर काहींचे अवयव पोलिओ किंवा अपघातामुळे निकामी झाले आहेत. (प्रतिनिधी)हजार जोडपी स्वावलंबी!
संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांनी सांगितले की, विविध संस्थांच्या मदतीने हा सोहळा पार पडणार आहे. संस्थेने याआधी २५ सार्वजनिक विकलांग सोहळे पार पाडले आहेत. त्या माध्यमातून आत्तापर्यंत संस्थेने १ हजार १०० जोडप्यांच्या विवाहाची जबाबदारी पार पाडली आहे. यापैकी अनेक जोडप्यांनी संस्थेमध्ये त्यांच्या पोलिओबाधित अवयवावर शस्त्रक्रियादेखील करून घेतली आहे. त्यांना संस्थेच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांतून स्वावलंबी होण्याची संधी मिळाली आहे.