Join us

समृद्धी महामार्गावर आतापर्यंत १०२ बळी; सात महिन्यांत १६९ अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2023 7:11 AM

समृद्धी महामार्ग पूर्णत: सरळ आहे. या मार्गावर क्वचितच वळणे आहेत.

मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असलेल्या एका खासगी बसला शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात २५ जण ठार झाले. गेल्यावर्षी ११ डिसेंबरला ‘समृद्धी’चा नागपूर ते शिर्डी हा ५२० कि.मी.चा पहिला टप्पा सुरू झाला तेव्हापासून १ जुलैपर्यंत या द्रुतगती महामार्गावर १६९ अपघात झाले असून शनिवारी झालेला अपघात सर्वांत मोठा होता. वाहनाचा वेग, चालकाचा थकवा, रस्त्याची सरळसोट रचना, सदोष वाहने आदी कारणे आतापर्यंत अपघातांना कारणीभूत ठरली आहेत. 

रस्त्याची रचना समृद्धी महामार्ग पूर्णत: सरळ आहे. या मार्गावर क्वचितच वळणे आहेत. त्यामुळे वाहनचालक बेफिकीरपणे भरधाव वेगाने वाहन चालवतात. वळण नसल्याने वेगावर नियंत्रण येत नाही. द्रुतगती मार्गांची रचना करतेवेळी टॅक्टटाइल इजलाइन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असतो तसेच चालकाला झोप लागून वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या लेनच्या शोल्डरवर गेले तर रम्बलरचा आवाज होऊन जाग येते. 

भरधाव वेग

एखाद्या महामार्गावर वेगमर्यादा ठरवताना  मार्गिका, दुभाजक, एण्ट्री-एक्झिट या बाबींचा अभ्यास करून वेगमर्यादा ठरवली जाते. समृद्धी महामार्गावरील वाहनांची वेगमर्यादा १२० किमी प्रतितास अशी आहे. प्रतितास १०० किमीहून अधिक वेगमर्यादा असलेला हा एकमेव मार्ग आहे परंतु या वेगात  जर अपघात झाला तर तो जीवघेणा ठरू शकतो. वाहनमालक वारंवार वाहनांची तपासणी करत नाहीत. परिवहन विभागाकडून महिन्यातून एकदा अचानक वाहन तपासणी करणे गरजेचे आहे. 

समृद्धी महामार्गाची वेग मर्यादा १२० किमी प्रतितास ठेवण्यात आला आहे. तो रस्ता पूर्णपणे सरळ आहे त्यामुळे वाहनचालक जास्त वेगाने वाहने चालवतात.  रस्त्यावर वळण असेल तर वाहनचालक अलर्ट राहतात मात्र सरळ रस्ता असल्याने वाहनचालक अतिआत्मविश्वास दाखवत स्पीडने गाडी चालवतात. त्यामुळे वेग निर्बंध असणे गरजेचे आहे.   - संदीप गायकवाड, वाहतूक अभ्यासक, परिसर संस्था

टॅग्स :अपघातसमृद्धी महामार्ग