Join us

सई ताम्हणकर साकारणार १०२ वर्षांची आजीबाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 2:48 AM

आपल्या हटके अदांनी, मदमस्त नृत्यांनी आणि आपल्या अभिनयाने समस्त तरुणाईला घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे, सई ताम्हणकर, पण सईने आता आपली ही इमेज बदलण्याचा निर्णय घेतलाय.

मुंबई : आपल्या हटके अदांनी, मदमस्त नृत्यांनी आणि आपल्या अभिनयाने समस्त तरुणाईला घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे, सई ताम्हणकर, पण सईने आता आपली ही इमेज बदलण्याचा निर्णय घेतलाय. सई आपल्या आगामी सिनेमात १०२ वर्षांच्या आजीबाईची भूमिका साकारणार आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या असलेली, पांढºया केसातल्या सई ताम्हणकरचा हा नवीन लूक थोड्याच दिवसांत रसिक प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. आश्चर्य म्हणजे, या सिनेमात सई ताम्हणकरच्या मुलाची भूमिका साकारणार आहे अभिनेता स्वप्निल जोशी. मोठ्या पडद्यावरील सर्वात यशस्वी जोडी आता आई-मुलाच्या भूमिकेत आपल्यासमोर लवकरच येणार आहे. स्वप्निल जोशीसुद्धा या सिनेमात ७० वर्षांच्या एका आजोबांच्या व्यक्तिरेखेत आपल्यासमोर येणार आहे. या सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन मराठी सिनेमातील यशस्वी दिग्दर्शक संजय जाधव करतोय. त्यामुळे ब-याच  दिवसांनी हा यशस्वी त्रिकूट जमून येणार आहे. याविषयी बोलताना सई म्हणाली, मला काही तरी हटके करून पाहायचे होते. माझ्या सध्याच्या काही सिनेमांतील भूमिकांमध्ये तोचतोचपणा आला होता. मी एका चांगल्या सशक्त कथेच्या शोधात होते. मला संजय दादाने या सिनेमाची कथा ऐकविली. ही भूमिका म्हणावी तितकी सोपी नाहीये. १०२ वर्षांची म्हातारी असली, तरी तिचा संघर्ष अजूनही संपलेला नाहीये, या वयातही तिला आपल्या एकुलत्या एक ७० वर्षाच्या मुलाची जबाबदारी काही कारणास्तव घ्यावी लागते. भूमिका मला खूप भावली, म्हणून मी हे आव्हान स्वीकारले आहे.’आपल्या स्टाईलिश लूकने लाखोे तरुणींना घायाळ करणाºया स्वप्निल जोशी आपल्या या हटके भूमिकेविषयी म्हणाला, ‘मला ही भूमिका वाचता क्षणीच आवडली. सिनेसृष्टीत इतकी वर्ष काम केल्यानंतर अशी वेगळी भूमिका करायला मिळणे, हे मी माझे भाग्य समजतो. इतकी वर्षे स्क्रीनवर सईसोबत रोमान्स केला, आमची एक जमलेली केमिस्ट्री आहे. आता ती माझ्या आईच्या भूमिकेत आहे. सिनेमात ती मला बदड बदड बदडते, की गाजराचा हलवा खायला घालते, हे तुम्हांला सिनेमा आल्यावरच कळेल. २०१८च्या दिवाळीत हा सिनेमा रिलीज करायचा संजय जाधवचा विचार आहे. सिनेमाचे नाव जरी अजून नक्की झाले नसले, तरी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून शूटिंग सुरू होणार आहे.

   वाचकहो, थोडा धक्का बसला ना, बातमी वाचून. नेहमीच ‘सिरिअसली’ बातम्या वाचणाऱ्या वाचकांना हा गोड धक्का देण्याचा छोटासा प्रयत्न. निमित्त अर्थातच आजच्या ‘एप्रिल फूल’ चे. डोण्ड टेक इट सिरिअसली...

टॅग्स :एप्रिल फूल 2018सई ताम्हणकर