मुंबई : मुंबईतील १०४ अतिधोकादायक इमारतींत अद्यापही रहिवासी जीव मुठीत घेऊन जगत आहेत. मात्र पावसाळ्यात या इमारतींना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या इमारती महिन्याभरात रिकाम्या करून घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार या इमारतींतील रहिवाशांना घर खाली करण्याची सक्ती करण्यात येणार आहे.दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक इमारतींचा धोका वाढतो. मात्र इमारत कोसळण्याच्या अनेक मोठ्या दुर्घटनांनंतरही अनेक अशा इमारतींमध्ये रहिवासी राहत आहेत. त्यामुळे अतिधोकादायक १०४ इमारती रिकाम्या करून घेण्यासाठी प्रबोधन कार्यक्रम राबवावेत. यामध्ये पोस्टर, माहितीपट यांचा प्रभावी उपयोग करावा; तसेच राबवित असलेल्या प्रक्रियेची योग्य प्रकारे नोंद होण्याच्या दृष्टीने प्रत्येक इमारतीची स्वतंत्र नस्ती तयार करावी, असे आदेश आयुक्त अजय मेहता यांनी गुरुवारी दिले.या प्रक्रिया राबवूनही इमारती रिकाम्या न केल्यास त्यांची वीज व जलजोडणी खंडित करावी. यानंतरही इमारती रिकाम्या करण्यासाठी अपेक्षित सहकार्य न मिळाल्यास गरजेनुसार पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाई करण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे. यापूर्वी १४४ इमारतींची वीज व जलजोडणी खंडित करण्यात आली आहे. या सर्व इमारतींची पुन्हा तपासणी करून अनधिकृतपणे वीज व जलजोडणी घेणाऱ्या इमारतींवर न्यायालयाचा अवमान खटला दाखल करण्यात येणार आहे.अशी होणार धोकादायक इमारतींवर कारवाईज्या इमारतींचे आयुर्मान ३० वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा सर्व इमारतींची संरचनात्मक तपासणी यापूर्वीच बंधनकारक करण्यात आली आहे. अशा सर्व इमारतींची संरचनात्मक तपासणी करून त्यांची यादी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना नोटीस पाठविण्यात येणार आहे.६६४ अतिधोकादायक इमारतींपैकी ९९ इमारती प्रक्रिया पूर्ण करून तोडण्यात आल्याने ही संख्या सध्या ५६५ एवढी आहे.यापैकी १०१ इमारती खाली करण्यात आल्या आहेत. उर्वरित ४६४ इमारतींबाबत कार्यवाही सुरू आहे.या ४६४ इमारतींपैकी १८० इमारतींबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रक्रिया स्थगित आहे. तर ३६ इमारतींबाबत तांत्रिक सल्लागार समितीच्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे.उर्वरित २४८ इमारतींपैकी १४४ इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात आला असून, १०४ इमारतींबाबत मे २०१८पूर्वी कारवाई होणे अपेक्षित आहे, अशी माहिती उपायुक्त (अतिक्रमण निर्मूलन) निधी चौधरी यांनी दिली.
१०४ इमारती महापालिकेच्या रडारवर! महिनाभरात इमारती रिकाम्या करा; अन्यथा वीज, जलजोडणी खंडित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 3:03 AM