मुंबई : कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात टाळेबंदी (लॉकडाऊन ) केल्यापासून बंदोबस्तावरील पोलिसांना मारहाणीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. गेल्या 25 दिवसात राज्यभरात विविध ठिकाणी अशा एकूण 105 घटना घडल्या आहेत.
ड्युटीवरील पोलिसाना मारहाण, हुज्जत घातल्याप्रकरणी एकूण 301 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर सरकारी कामकाजात हस्तक्षेप, अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिक रस्त्यावर बाहेर पडू नयेत, म्हणून राज्यातील सर्व प्रमुख महानगर, शहर, गाव याठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदीचे काम 24 मार्चपासून सलगपणे सुरु आहे, त्यामुळे यावेळी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या काही हुल्लडबाज नागरिकांकडून पोलिसांशी वाद घातला जात आहे, अनेकवेळा मारामारी होते, त्याच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जात आहे. त्याचप्रमाणे त्याची वाहने जप्त केली जात आहेत. ------------------------------
40 पोलिसांना कोरोनाची लागण राज्यातील एकूण 8 अधिकारी व 32 पोलिसाना कोरोना पोझिटिव्ह अहवाल आला आहे. ही आकडेवारी रविवार दुपारपर्यंतची असून त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व संबधितांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याशिवाय त्याच्या संपर्कात असलेल्या अधिकारी, अंमलदाराची तपासणी करण्यात आली आहे. मुंबईत आरसीएफ पोलीस ठाण्यातील एक अधिकारी होम क्वारंटाइन असताना त्याला पोलीस ठाण्यात ड्युटी लावण्याचा अजब प्रकार घडला होता. वरिष्ठकडून हा प्रकार दडपन्याचा प्रकार सुरु असताना "लोकमत 'हा प्रकार चव्हाट्यावर आणला होता.