"राणीच्या बागेत 'पेंग्विन' टोळीचा 106 कोटींचा दरोडा"; भाजपाचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 02:28 PM2022-01-20T14:28:56+5:302022-01-20T14:33:02+5:30

महापालिकेच्या रस्ते निविदांत  संगनमताने गैरप्रकार करणारी मुंबई महापालिकेतील कंत्राटदार टोळी आता दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेतही उतरली आहे.

106 crore robbery of 'Penguin' gang in rani baugh says BJP Mihir Kotecha | "राणीच्या बागेत 'पेंग्विन' टोळीचा 106 कोटींचा दरोडा"; भाजपाचा गंभीर आरोप

"राणीच्या बागेत 'पेंग्विन' टोळीचा 106 कोटींचा दरोडा"; भाजपाचा गंभीर आरोप

Next

राणीच्या बागेत दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेत १०६ कोटींचा गैरप्रकार झाला असून ही निविदा प्रक्रिया त्वरीत थांबवावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा, मुंबई महापालिकेतील भाजपा पक्षनेते विनोद मिश्रा, नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांनी केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली. ही निविदा प्रक्रिया न थांबविल्यास भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला.  

कोटेचा यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीने मुंबई महापालिकेतील रस्ते कामातील घोटाळे उघडकीस आणून महापालिकेचे १३६ कोटी रु. वाचविले. परिवहन महामंडळाच्या ई तिकीट यंत्र खरेदीतील घोटाळाही आम्ही उघडकीस आणला. महापालिकेच्या रस्ते निविदांत  संगनमताने गैरप्रकार करणारी मुंबई महापालिकेतील कंत्राटदार टोळी आता दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेतही उतरली आहे. राणीच्या बागेत ब्लॅक जॅग्वार, चित्ता, व्हाईट लायन, चिंपांझी या सारखे प्राणी आणण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. १०० कोटींच्या वरच्या निविदेत विदेशी कंपन्याही उतरू शकतात. त्यामुळे १८५ कोटींच्या निविदेचे दोन भाग करण्यात आले. 

या निविदेत गैरप्रकार होत असून निविदा रकमेपेक्षा अधिक रकमेच्या निविदा भरल्या जातील असे पत्र महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना २० ऑक्टोबर रोजी पाठविले होते. विनोद मिश्रा यांनीही असेच पात्र महापालिका आयुक्तांना २१ ऑक्टोबर रोजी पाठविले होते. २९ नोव्हेंबरला निविदा उघडण्यात आल्या त्यावेळी आम्ही व्यक्त केलेली भीती खरी ठरली होती. हाय वे आणि स्काय वे या कंपन्यांनी १०६ कोटी अधिक रकमेची निविदा सादर केली आहे. १८८ कोटींच्या बोलीसाठी २९४ कोटींच्या निविदा सादर केल्या गेल्या आहेत असं कोटेचा यांनी सांगितलं. 

या संदर्भात आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली असून या प्रक्रियेच्या चौकशीचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सध्या मुख्यमंत्री कार्यालयात असलेले महापालिकेचे  निवृत्त उपायुक्त हे 'भ्रष्टाचाराचे महामार्ग'  तयार करत आहेत असा आरोपही कोटेचा, विनोद मिश्रा, नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांनी केला. तसेच मी फक्त बिल्डर नाही तर माझी शिपींग कंपनीही आहे. माझं दुबईत रेस्ट्रॅाही आहे. माझे अनेक उद्योग व्यवसाय आहेत. जे काही आहे ते सगळं इलेक्शनच्या शपथपत्रावर लिहिलं आहे. तुम्ही पूर्ण माहिती घ्या, तुम्ही एक रूपयाचं ही काही काढलं तरी चालेल. तुमची सत्ता आहे प्रशासन तुमच जे काही शक्य आहे ते सगळ करा अशा शब्दात मिहीर कोटेचा यांनी महापौरांना उत्तर दिलं आहे. 
 

Web Title: 106 crore robbery of 'Penguin' gang in rani baugh says BJP Mihir Kotecha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.