दहीहंडी उत्सवात १०६ जखमी, ३ गंभीर, ७४ जणांना डिस्चार्ज; मुंबईतील ३२ गोविंदांवर उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 06:20 AM2024-08-28T06:20:11+5:302024-08-28T06:20:29+5:30

वाकोला येथील गोविंद पथकातील ३४ वर्षीय गोविंदाच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

106 injured 3 serious 74 discharged in Dahi Handi festival 32 Govindas in Mumbai are undergoing treatment | दहीहंडी उत्सवात १०६ जखमी, ३ गंभीर, ७४ जणांना डिस्चार्ज; मुंबईतील ३२ गोविंदांवर उपचार सुरू

दहीहंडी उत्सवात १०६ जखमी, ३ गंभीर, ७४ जणांना डिस्चार्ज; मुंबईतील ३२ गोविंदांवर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात दहीहंडी साजरी करताना मंगळवारी १०६ गोविंदा जखमी झाले असून, त्यातील तीन गोविंदांची प्रकृती गंभीर आहे. जखमींपैकी ७४ गोविंदांना उपचार करून घरी पाठवण्यात आले.  १५ गोविंदांना अधिक उपाचारासाठी  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींमध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे.

दरम्यान, वाकोला येथील गोविंद पथकातील ३४ वर्षीय गोविंदाच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी यांनी दिली.

डोक्याला गंभीर दुखापत 
के.इ.एम.मध्ये सहा गोविंदांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  त्यामध्ये २५ वर्षीय गोविंदाच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे त्यांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती के.इ.एम. अधिष्ठाता डॉ. मोहन देसाई यांनी दिली.

मुलीचे मांडीचे हाड मोडले 
१३ वर्षांच्या आर्या गंगावणे  हिच्या मांडीचे हाड मोडल्यामुळे तिला नायर रुग्णालयात दाखल केले आहे, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी दिली. राजावाडी रुग्णालयात तीन लहान मुलांना दाखल करून घेण्यात आले आहे. त्यामध्ये अवतार सिंग (११), विनायक जैस्वाल (६), इमान शेख (९) या तिघांचा समावेश आहे. 

रुग्णालयात दाखल 
नायर रुग्णालय    १
सेंट जॉर्जेस रुग्णालय    २ 
लीलावती रुग्णालय    १ 
उपनगरीय रुग्णालय    ६ 
केइएम रुग्णालय    ५ 
ट्रॉमा रुग्णालय    १

ठाणे : ठाण्यात १४ गोविंदा जखमी झाले आहेत. जिग्नेश तांबले (२६) याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले असून ऋषिकेश धायबर (२१) याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याच्यावर कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित सहा जणांना किरकोळ दुखापत झाली. 

नवी मुंबई : नवी मुंबईत दिवसभरात एकूण सात गोविंदा जखमी झाले होते. त्यापैकी दोघांच्या पायाला गंभीर दुखापत असल्याने त्यांना वाशीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दाेघांचे हात फ्रॅक्चर
सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले की, मुझामिर शेख (६) आणि यश वाघेला (११)  यांचे हात फ्रॅक्चर झाले असून, रुग्णलयातील कर्मचारी संजय हाटे (५८) याच्याही डोक्याला दुखापत झाली आहे. तसेच गौरव कनोजिया (१९)  याच्या करंगळीला दुखापत झाली आहे.

Web Title: 106 injured 3 serious 74 discharged in Dahi Handi festival 32 Govindas in Mumbai are undergoing treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.