- संताेष आंधळेमुंबई : दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मुंबईत १०७ गोविंदा जखमी झाले असून त्यापैकी सातजणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. एका गोविंदाला मार लागल्यानंतर त्याच्यासोबत आणखी काही गोविंदा सोबत येत असल्यामुळे महापालिकेतील रुग्णालयाचा ‘कॅज्युल्टी’ विभाग गोविंदामय झाल्याचे चित्र सर्वच रुग्णालयांत दिसत आहे. बहुतांश रुग्णांना हाडाचे दुखणे असल्याचे दिसत आहे.
उपचारासाठी ज्या गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यामध्ये ७ गोविंदा केइएम रुग्णालयात, कूपर आणि राजावाडी रुग्णालयात प्रत्येकी दोन, तर प्रत्येकी १ वांद्रे भाभा, वीर सावरकर हॉस्पिटल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात अधिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहेत. ६२ गोविंदांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे, तर ३१ गोविंदांवर ओपीडीमध्ये सध्या उपचार सुरू आहेत.