१०८ रुग्णवाहिकेने ४६ हजार रुग्णांना दिले जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 03:04 AM2020-12-15T03:04:27+5:302020-12-15T03:04:42+5:30

लॉकडाउनच्या काळात मुंबईतील सर्व रुग्णालय व रुग्णवाहिका चोवीस तास कार्यरत होत्या. अनेकदा रुग्णांना रुग्णवाहिकेसाठी अनेक तास प्रतीक्षा करावी लागे. 

108 ambulances saved life of 46000 patients | १०८ रुग्णवाहिकेने ४६ हजार रुग्णांना दिले जीवनदान

१०८ रुग्णवाहिकेने ४६ हजार रुग्णांना दिले जीवनदान

Next

मुंबई : कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली. या काळात हेल्पलाइन क्रमांक १०८च्या रुग्णवाहिकांनीदेखील अनेकांचे प्राण वाचविले. लॉकडाउनच्या काळात मुंबईतील सर्व रुग्णालय व रुग्णवाहिका चोवीस तास कार्यरत होत्या. अनेकदा रुग्णांना रुग्णवाहिकेसाठी अनेक तास प्रतीक्षा करावी लागे. 

या काळात कोरोना रुग्णांवरच सर्वांचे लक्ष लागले असल्याने इतर रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती.  मात्र या काळात सर्व रुग्णांसाठी १०८ रुग्णवाहिकेने अत्यंत महत्त्वाचे कार्य बजावले. १०८ रुग्णवाहिकेने कोरोनाच्या काळात मुंबईत एकूण ४६ हजार २४९ रुग्णांना जीवनदान दिले. 
त्यात ३३ हजार ३८१ रुग्ण हे कोरोना बाधित होते. तर १२ हजार ८६८ रुग्ण हे कोरोनाशिवाय इतर आजारांचे होते. 

संपूर्ण महाराष्ट्रात या रुग्णवाहिकांनी ७० हजार १७९ रुग्णांना जीवनदान दिले. या कार्यात राज्यभरात एकूण ५६१ रुग्णवाहिका सहभागी होत्या. 
याचा नागरिकांना लाभ झाला. अनेकांचे प्राण वाचले. यापुढे ही सेवा अशीच मिळावी, अशी मागणी आहे.

नागरिकांना भीतीच्या काळातही दिला दिलासा
 सुरुवातीच्या काळात अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. कोरोनाचा उपचारांसाठी रुग्णालयात कसे पोहोचावे याबाबतीत नागरिकांमध्ये संभ्रम होता. 
 मात्र त्या काळात रुग्णांना १०८ रुग्णवाहिका खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी ठरली. 

कर्मचारी व चालकांना योग्य सुविधा मिळाल्या
 कोरोनाच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी शासनाने योग्य सुविधा पुरविल्या होत्या. प्रत्येक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे पीपीई किट, औषधे अशा सोयीसुविधांची गरज आहे. 
 त्या प्रमाणात सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पुरविण्यात येत होत्या. यामुळे काेरोनाच्या काळात सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत कोणत्याच सोयीसुविधांची कमतरता भासली नाही.

मे महिन्यात भांडुप येथे एका ज्येष्ठ नागरिकाला हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला तातडीने चेंबूर येथील एका रुग्णालयात घेऊन जायचे होते. रुग्णालयात घेऊन गेल्यावर त्या रुग्णाचे कोरोना रिपोर्टदेखील पॉझिटिव्ह आले होते. अशा वेळेस रुग्ण वाचण्याची शक्यता कमी होती. मात्र रुग्णालयात वेळेत दाखल केल्याने त्या रुग्णाचे प्राण वाचल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 
- सुधीर फडतरे, रुग्णवाहिका चालक

सुरुवातीच्या काळात मुंबईत कोरोनाचा जोर जास्त असल्याने रुग्णवाहिकेसाठी काम करणारे अनेक कर्मचारी बाधित झाले होते. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. असे असूनही १०८ रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा म्हणून काम केले. 
डॉ. ज्ञानेश्वर शेळके, चीफ ऑपेरेशन्स अधिकारी, महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस

Web Title: 108 ambulances saved life of 46000 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.