मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होणार असून, नगरसेवक व राजकीय पक्षांकडे प्रचारासाठी कमी अवधी उरणार आहे. त्यामुळे विकासाचे प्रकल्प झटपट हाती घेऊन श्रेय लाटण्याची धडपड सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे. त्यानुसार रस्ते, नाले, पर्जन्य जलवाहिन्यांच्या दुरुस्ती, देखभालीचे कार्यादेश देण्यास सुरुवात झाली आहे. १०७.८४ कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या विकासकामांचा बार लवकरच उडणार आहे.फेब्रुवारी २०१७मध्ये महापालिकेची निवडणूक आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र गेल्या वर्षभरात रस्ते, नाले अशा सर्वच महत्त्वाच्या नागरी कामांमध्ये घोटाळा झाल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना-भाजपाला अडचणीत आणण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. त्यानुसार विरोधी पक्षांची मोर्चेबांधणीही सुरू आहे. तत्पूर्वी मोठे प्रकल्प, विकासकामे, नागरी सुविधा जाहीर करून त्यावर विकासाचे पांघरूण घालण्याची युतीची धावपळ सुरू आहे. दरम्यान, निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी विकासकामांचे बार उडविण्यात येणार आहेत. यामध्ये रस्ते, नाले, पर्जन्य जलवाहिन्यांची दुरुस्ती या कामांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)कमी खर्चात कामेमुंबई महापालिकेच्या कामांमध्ये घोटाळे झाल्याचे आरोप यापूर्वी अनेकदा झाले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून खडाजंगीही झाली आहे. कधी घोटाळे तर कामांसाठी दर्शवण्यात आलेला भरमसाठ खर्च यावरून प्रशासनावर अनेकदा टीकाही झाली आहे. याचा सारासार विचार करत महापालिकेच्या अंदाज खर्चापेक्षा १५ ते २० टक्के कमी दराने कामे करण्याची तयारी ठेकेदारांनी दाखवली आहे.
पालिकेचा १०८ कोटींच्या कामांना हिरवा कंदील
By admin | Published: October 01, 2016 2:55 AM