डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी १०८९ कोटी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 05:49 AM2020-03-05T05:49:06+5:302020-03-05T05:49:34+5:30

१५ जानेवारी, २०२० रोजी राज्य मंत्रिमंडळाने स्मारकाचा चबुतरा १०० फूट, पुतळा ३५० फूट आणि स्मारकाची जमिनीपासूनची उंची ४५० फूट करण्याबाबतचा निर्णय घेतला.

1089 crores spent for the memorial of Dr. Babasaheb Ambedkar | डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी १०८९ कोटी खर्च

डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी १०८९ कोटी खर्च

googlenewsNext

मुंबई : मुंबईतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला गती देण्यासाठी एमएमआरडीए सज्ज झाली असून, या कामावर १०८९ कोटी रुपये खर्चाचे ढोबळ अंदाजपत्रक तयार केले आहे. २०१५ साली स्मारकाचे भूमिपूजन झाले तेव्हा ४२५ कोटींचा खर्च अपेक्षित होता. त्यात अडीच पटीने वाढ करून भव्य स्मारक साकारले जाईल. तर, शिवस्मारकाच्या कामातील दिरंगाईमुळे प्रस्तावित खर्चात एक हजार कोटींची वाढ झाली.
११ आॅक्टोबर, २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदू मिलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले. त्या वेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या या स्मारकासाठी ४२५ कोटी रुपये खर्च केले जातील, असे सांगण्यात आले होते. परंतु, स्मारकाच्या आराखड्यास राज्य सरकारने १३ एप्रिल, २०१७ रोजी मंजुरी दिली. त्यानंतर १२ जानेवारी, २०१८ रोजी एमएमआरडीएच्या बैठकीत आराखडा मंजूर झाला तेव्हा अंदाजित खर्च ७६३ कोटींवर गेला.
१५ जानेवारी, २०२० रोजी राज्य मंत्रिमंडळाने स्मारकाचा चबुतरा १०० फूट, पुतळा ३५० फूट आणि स्मारकाची जमिनीपासूनची उंची ४५० फूट करण्याबाबतचा निर्णय घेतला. त्यानंतर सुधारित संकल्पनेनुसार स्मारकाचा विस्तृत आराखडा तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासाठी नव्याने आवश्यक असलेल्या वाहतनळ, अग्निसुरक्षा, सीआरझेड, पर्यावरण विभाग आदींच्या परवानग्यांसाठी अर्ज केले आहेत. सुधारित स्मारकाचा ढोबळ अंदाजखर्चही तयार केला असून तो १०८९ कोटींवर गेल्याची माहिती एमएमआरडीएतल्या सूत्रांकडून हाती आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्मारकाच्या परिसरात सुचविलेल्या कामांसाठी १० कोटी खर्च होतील. कामाचे व्यवस्थापन, आकस्मिकखर्च आदींवरही सुमारे ९० कोटींचा खर्च होणार असल्याची माहिती हाती आली आहे.
>खर्च राज्य सरकारच्या तिजोरीतून
स्मारकाच्या कामासाठी मे. शापुरजी पालनजी या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. बदललेल्या कामाची जबाबदारीही त्यांच्याकडेच सोपविली जाण्याची शक्यता आहे. स्मारकासाठीचा खर्च एमएमआरडीए करणार असून, राज्य सरकारकडून त्याची प्रतिपूर्ती होईल. हा ढोबळ अंदाजखर्च असून तंतोतंत अंदाजपत्रक हे कामाची सविस्तर माहिती, इंजिनीअरिंग डिझाईन पूर्ण झाल्यानंतरच समजेल. मात्र, ढोबळ अंदाज खर्चापेक्षा त्यात फरक नसेल, असे एमएमआरडीएतल्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: 1089 crores spent for the memorial of Dr. Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.