गिरणी कामगारांचा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गृहप्रवेश; १०९ जणांना घरे मिळाली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 06:19 AM2023-09-17T06:19:02+5:302023-09-17T06:19:15+5:30

बॉम्बे डाईंग व श्रीनिवासमधील १०९ गिरणी कामगारांना घरे मिळाली

109 mill workers from Bombay Dyeing and Srinivas got houses | गिरणी कामगारांचा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गृहप्रवेश; १०९ जणांना घरे मिळाली

गिरणी कामगारांचा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गृहप्रवेश; १०९ जणांना घरे मिळाली

googlenewsNext

मुंबई : बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी २०२० मध्ये म्हाडाने ज्या घरांच्या सोडती काढल्या होत्या, त्यामधील यशस्वी ढारलेल्या पात्र अशा १०९ गिरणी कामगार / वारस यांना पाचव्या टप्प्यांतर्गत घरांच्या चाव्या देण्यात आल्या. म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात हा कार्यक्रम झाला.

म्हाडा व गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चावी वाटप कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, उपमुख्य अधिकारी योगेश महाजन उपस्थित होते.   

सुनील राणे म्हणाले की, आतापर्यंत २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र व सदनिकेच्या विक्री किमतीचा, मुद्रांक शुल्काचा भरणा केलेल्या ९८७ गिरणी कामगारांना १५ जुलैपासून चार टप्प्यांत सदनिकांच्या चावीचे वाटप करण्यात आले आहे. या वेळच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर स्वत:च्या हक्काच्या घरात प्रवेश करण्याची संधी गिरणी कामगार / वारस यांना मिळाली आहे. मुंबई मंडळ व कामगार विभाग यांच्यातर्फे सोडतीतील उर्वरित गिरणी कामगार वा वारस यांची पात्रता निश्चित करण्याचे काम वेगात सुरू असून त्यांना लवकरच  सदनिकांच्या चाव्या देण्याचा प्रयत्न आहे.

मिलिंद बोरीकर म्हणाले की, मुंबई मंडळामार्फत ५८  बंद व आजारी  गिरण्यांमधील एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी अभियान मुख्यालयातील पहिला मजला, कक्ष क्रमांक २४०, पणन कक्ष येथे सुरू केले आहे. त्यासंबंधात कागदपत्रे सादर करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे.  कामगार व वारसांनी म्हाडा मुख्यालयात येऊन प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करण्याव्यतिरिक्त www.millworkereligibility.mhada.gov.in या संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करावीत. तसेच मोबाइलमध्ये  मिल वर्कर्स एलिजिबिलिटी या नावाने ॲप उपलब्ध आहे. 

Web Title: 109 mill workers from Bombay Dyeing and Srinivas got houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.