बाबा सिद्दिकी हत्याकांडात 10वा आरोपी अटकेत; हल्लेखोरांना पुरवली शस्त्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 07:25 PM2024-10-20T19:25:10+5:302024-10-20T19:25:30+5:30
न्यायालयाने आरोपीला 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या खून प्रकरणातील ही 10वी अटक आहे. भागवत सिंग असे आरोपीचे नाव आहे. भागवतला नवी मुंबईतील बेलापूर येथून अटक करण्यात आली आहे. तो राजस्थानमधील उदयपूरचा रहिवासी आहे. हल्ल्याच्या दिवसापर्यंत भागवत सिंह मुंबईतील बीकेसी भागात राहत होता.
तपासादरम्यान भागवत सिंगनेच गोळीबार करणाऱ्यांना शस्त्रे पुरवल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बाबा सिद्दिकींची निर्घृण हत्या
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी दसऱ्याच्या दिवशी (12 ऑक्टोबर) राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची वांद्रे परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. बाबा सिद्दीकी हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नाव होते. त्यांच्या निधनावर देशभरातील बड्या नेत्यांनी शोक व्यक्त केला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.