मुंबई : दहावीच्या तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षांच्या तोंडावर मुंबईसह राज्यभरातील नववी ते बारावीच्या शिक्षकांना अध्ययन क्षमतांची वृद्धी करण्याकरिता मुंबईबाहेर निवासी प्रशिक्षण लावण्यात आले आहे. तीन दिवसीय प्रशिक्षणामुळे परीक्षा, शाळा सोडून शिक्षकांना जावे लागणार आहे.
मेटाकुटीला आलेल्या शिक्षक संघटनांनी यापुढे अतिरिक्त कामे लावल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे १४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या प्रशिक्षणाचे पत्र शाळांना दोन दिवसआधी म्हणजे १२ फेब्रुवारीला मिळाले. त्यामुळे परीक्षांच्या तोंडावर मुंबईतील १४४ शिक्षकांना अचानक तीन दिवस शाळेबाहेर राहावे लागणार असल्याने शाळांचे नियोजन कोसळले आहे.
महिनाभरापूर्वी राज्यातील सर्वच शिक्षकांनी पाच दिवसांचे प्रशिक्षण घेतले होते. आता पुन्हा प्रशिक्षणाला जावे लागणार असल्याने दहावीच्या तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा घ्यायच्या कधी? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
कशाचे प्रशिक्षण?
माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजेच दहावी-बारावीच्या शिक्षकांच्या अध्यापनाच्या क्षमता वाढाव्या याकरिता हे प्रशिक्षण घेत आहेत.खोपोलीतील शैक्षणिक संस्थेत तीन दिवस हे प्रशिक्षण असेल. या शिक्षकांना प्रशिक्षणानंतर वार्डस्तरावरील शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचे आहे.
यापुढे कोणतीही प्रशिक्षणे, सर्वेक्षण व अन्य शैक्षणिक कामे शिक्षकांना लावू नये, अन्यथा या कामावर बहिष्कार टाकून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवनाथ दराडे यांनी दिला आहे.
गेले दोन महिने शिक्षकांवर सातत्याने अतिरिक्त कामे लादली जात आहेत. आता निवडणुकीच्या कामाकरिता अनेक शिक्षक शाळेबाहेर आहेत. त्यात नववी-दहावीच्या शिक्षकांनाही बोलावण्यात आल्याने शाळांचे नियोजन विस्कटले आहे. - शिवनाथ दराडे, कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद
डिसेंबर-जानेवारीत अनेक शाळा सहली, वार्षिकोत्सव आदी उपक्रमांचे आयोजन करत असतात. या कामात शिक्षक बरेचसे व्यस्त असतात. त्यात यंदा दोन आठवडे मराठा सर्वेक्षणाच्या कामात गेले.
पुन्हा तीन दिवसांचे प्रशिक्षण लागल्याने शिक्षक-मुख्याध्यापक मेटाकुटीला आले आहेत. अनेक शाळांत दहावीच्या परीक्षेची तयारी सुरू आहे.