लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई विभागातून उत्तीर्ण झालेल्या ३.२५ लाख विद्यार्थ्यांपैकी सुमारे चार टक्के म्हणजे १३,४३० विद्यार्थ्यांना ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या १,६४५ने वाढली आहे, तर आठ विद्यार्थ्यांना १०० टक्के मिळाले आहेत. ठाण्याच्या नौपाडा येथील सरस्वती सेकंडरी स्कूलच्या अनन्या कुलकर्णी हिने १०० टक्के मिळवत अव्वल कामगिरी केली आहे. भरतनाट्यम्मधून आपली नृत्याची आवड जोपासत तिने ही कामगिरी केली आहे. अनन्याला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. आपल्या यशात शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे तिने सांगितले. मुख्य म्हणजे अभ्यास सुरू असताना तिने आपले छंदही जोपासले.
ठाण्याच्या ए. के. जोशी शाळेच्या अनुष्का काळे हिनेही १०० टक्के गुण मिळवत आपल्या यशात शाळेचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. तिला इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचे आहे. अभ्यासाबरोबरच अन्य उपक्रमांमध्ये भाग घेणे आवश्यक असल्याचे तिने सांगितले. अनन्या आणि अनुष्का हिच्याप्रमाणे अव्वल कामगिरी करणाऱ्या मुंबईच्या खुशी शिंदे हिनेही आपली चित्रकला आणि कथ्थकचा छंद जोपासत यश मिळविले. स्वयंअध्ययन आणि सराव हे आपल्या यशाचे सूत्र असल्याचे तिने सांगितले. खुशीच्या आई संस्कारधाम ज्युनिअर कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र विषयाच्या शिक्षिका आहेत. अभ्यासात आईची खूप मदत झाल्याचे तिने सांगितले. चित्रकला आणि नृत्यामुळे अभ्यासाचा ताण हलका होण्यास मदत झाली. तिलाही विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचा आहे.
मुंबईतून १०० टक्के गुण मिळविणाऱ्यांमध्ये सात मुली
- अनन्या कुलकर्णी (सरस्वती सेकंडरी स्कूल, ठाणे)
- अनुष्का काळे (आनंदीबाई केशव जोशी इंग्लिश मीडियम स्कूल, ठाणे)
- आर्या ढवळे (सिस्टर निवेदिता इंग्लिश मीडियम हायस्कूल, डोंबिवली)
- खुशी शिंदे (डीएसआरव्ही, मालाड)
- शार्वी महंते (कॅर्मेलाईट कॉन्व्हेन्ट हायस्कूल, वसई)
- सृष्टी काळे (एनआरसी कॉलनी स्कूल, कल्याण)
- प्रथमेश दाते (सिस्टर निवेदिता इंग्लिश मीडियम हायस्कूल, डोंबिवली)
- पूर्वा शिर्के (कॅरमल कॉन्व्हेन्ट हायस्कूल, बदलापूर)
टक्केवारीनिहाय निकाल
- ९० हून अधिक १३,४३०
- ८५ ते ९० २१,५४१
- ८० ते ८५ २८,८१९
- ७५ ते ८० ३३,९७६
- ७० ते ७५ ३७,५५७
- ६५ ते ७० ३९,४१७
- ६० ते ६५ ४३,६००
- ४५ ते ६० ८८,८०३
- ४५ पेक्षा कमी ३२,२९०
मुंबईतील ९० टक्केवाले
- २०२४ : १३,४३०
- २०२३ : ११,७८५
- २०२२ : १०,७६४
- २०२१ : १५,५५०
३० टक्के विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण
मुंबईतील ३० टक्के विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह म्हणजे ७५ टक्क्यांहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबईतून ९७,३५४ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.
पालघर जिल्ह्याचा निकाल ९६.०७ टक्के - पालघर जिल्ह्याचा निकाल ९६.०७ टक्के लागला असून परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत मुलींनी (९६.९५ टक्के) मुलांवर (९५.२८ टक्के) बाजी मारली. सर्वाधिक निकालाच्या गुणवत्तेत याही वर्षी वसई तालुक्याचा ९७.४१ टक्के, तर सर्वात कमी निकाल डहाणू तालुक्याचा ९०.८० टक्के लागला आहे. पालघर जिल्ह्यात एकूण ३२,१७३ मुलांपैकी ३०,६५७ जण उत्तीर्ण झाली आहेत. २८,९६१ मुलींपैकी २८,०७८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.२८ टक्के असून, मुलींचे प्रमाण ९६.९५ टक्के इतके आहे. पालघर जिल्ह्यातून ६१,४३५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६१,१३४ जणांनी परीक्षा दिली होती. यातून ५८,७३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
ठाण्यात पुन्हा मुलींचीच बाजी; निकाल ९५.५६ टक्के - यावर्षी इयत्ता दहावीचा (एसएससी बोर्ड) निकाल सोमवारी जाहीर झाला. ठाणे जिल्ह्याचा निकाल ९५.५६ टक्के लागला. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून, मुलींचा निकाल ९६.७९ टक्के लागला, तर मुलांचा निकाल ९४.३९ टक्के लागला. जिल्ह्यात एकूण एक लाख आठ हजार ३७८ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यामध्ये ५३ हजार ७८० इतक्या मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ५४ हजार ५९८ मुले उत्तीर्ण झाले. दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होताच निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफे, घरी, मोबाइल, संगणकावर विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. आपापला निकाल समजताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. जिल्ह्यातील एकूण एक लाख १३ हजार ४०३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात ५७ हजार ८४१ मुले आणि ५५ हजार ५६२ मुलींचा समावेश होता.
रायगडचा दहावीचा निकाल ९६.७५ टक्के - दहावी परीक्षेचा रायगडचा निकाल ९६.७५ टक्के लागला असून, यंदा १.४७ टक्क्याने वाढ झाली आहे. यंदा उत्तीर्ण होण्यात मुलींचा टक्का ०.९७ टक्क्यांनी वाढला आहे, तर मुलांचा टक्का १.८८ टक्क्यांनी वाढला आहे. जिल्ह्यातून ३५ हजार ९१३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ३५ हजार ७२७ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. निकालात १७ हजार ३४१ मुले, १७ हजार २२७ मुली असे एकूण ३४ हजार ५६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, १ हजार १५९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.७५ टक्के इतके आहे.
ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई अव्वल - दहावी परीक्षेत नवी मुंबई शहराचा निकाल ९७.४५ टक्के इतका लागला आहे. यात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलीच अव्वल ठरल्या आहेत. यंदा ९६.७८ टक्के मुले तर ९८.१६ टक्के मुली पास झाल्या आहेत. नवी मुंबईतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. शहरातील १४३ शाळांच्या माध्यमातून १५ हजार ६३६ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते. यामधील १५ हजार २३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर ६० टक्के पुनर्परीक्षार्थीही पास झाले आहेत.