Join us

प्रवासहालाचे ११ दिवस, पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे मन:स्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 5:59 AM

रविवारच्या मेगा ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल झाले. 

मुंबई : खार आणि गोरेगाव दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम रविवारी रात्री उशिरा पूर्ण झाले. मात्र, या कामामुळे २७ ऑक्टोबरपासून सुरू असलेला ब्लॉक प्रवाशांसाठी प्रचंड मन:स्तापाचा ठरला. शेकडो लोकल फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना रोजच्या प्रवासासाठी मोठ्या दिव्याला सामोरे जावे लागले. लोकल रुसल्याने अनेकांनी या ११ दिवसांत बस, टॅक्सी, खासगी वाहने यांचा वापर कार्यालयांत पोहोचण्यासाठी केला. दरम्यान, रविवारच्या मेगा ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल झाले. ब्लॉक काळात अनेक लोकल फेऱ्या रद्द झाल्याने बोरिवली, अंधेरी, मालाड, वांद्रे, दादर या स्थानकांवर गर्दीचा उच्चांक गाठला गेला. त्यामुळे सकाळी कार्यालय आणि सायंकाळी घर गाठताना चाकरमान्यांची तारांबळ उडाली. एसी लोकलनेही मान टाकल्याने प्रवासहालात भर पडली. 

यांच्याकडून लूट ब्लॉक असल्याने रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून दुप्पट-तिप्पट भाडे आकारले. अंधेरी स्थानक परिसरातून  बोरिवली आणि विरारच्या दिशेने जाण्यासाठी अप आधारित कंपन्यांनी चार ते पाचपट भाडे आकारल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. १७ एसी लोकल फेऱ्या  पश्चिम रेल्वेने उपनगरीय गाड्यांच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवार, ६ नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवर अतिरिक्त १७ एसी लोकल सेवा सुरू केल्या जाणार आहेत.

टॅग्स :पश्चिम रेल्वेमुंबई लोकल