मुंबई - गेल्या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने एकूण ११ किलो ३९ ग्रॅम सोने व १२ हजार सिगरेट असा एकूण ७ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहेत. एकूण २७ प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये एकूण २२ लोकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बहुतांश भारतीय नागरिकांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, दुबई, अबुधाबी, जेद्दा, मस्कत तसेच मलेशियावरून मुंबईत येणाऱ्या काही प्रवाशांमार्फत सोन्याची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. या दरम्यान अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीमध्ये त्यांना सोन्याच्या बांगड्या, सोन्याच्या चेन, सोन्याची पेस्ट, सोन्याची पावडर या स्वरूपात सोने आढळून आले. हे सोने बॅगेत, कपड्यात लपविल्याचे आढळून आले. याच दरम्यान, अबुधाबीवरून मुंबईत दाखल झालेल्या एका प्रवाशाच्या बॅगेत तब्बल १२ हजार ८६० सिगरेट आढळून आल्या.