घराचे आमिष दाखवत ११ लाखांचा चुना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 08:54 AM2023-08-14T08:54:34+5:302023-08-14T08:55:12+5:30
भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वर्सोव्यामध्ये ११ लाखांत घर मिळवून देतो असे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पैसे मागितले असता त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कासिफ सय्यद नावाच्या भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार मोहम्मद खान (४६) यांचा कुर्ल्यातील ठक्कर बाप्पा कॉलनीत व्यवसाय आहे. त्यांना घर घ्यायचे असल्याने त्यांनी मित्र इरफान शेख याला सांगितले होते. शेखने सय्यद सोबत खानची ओळख करून दिली. सय्यदने बांद्रा आणि वर्सोवा या ठिकाणी बांधकाम सुरू असून जंगले हाऊस परिसरात बिल्डिंगचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे, असे म्हणत खान यांना तिथला फ्लॅट क्रमांक २०२ दाखविला. त्याची किंमत ११ लाख रुपये असल्याचेही तो म्हणाल्याने दोन ते तीन महिन्यांत त्याचा ताबा मिळेल असेही सय्यदने आश्वासन दिले. त्यानुसार अकरा लाख रुपये सय्यदला तक्रारदाराने दिले.
दोन महिन्यानंतर जेव्हा खान यांनी सय्यदकडे फ्लॅटचा ताबा देण्याबाबत विचारणा केली असता तो टाळाटाळ करू लागला. त्याला कंटाळून खान यांनी त्याच्याकडे अकरा लाख रुपये परत मागितले. त्यावर सगळी रक्कम मी बांधकामात गुंतवली असून ती परत देणे शक्य नाही असे सय्यद म्हणाला. अखेर खान यांनी या प्रकरणी वर्सोवा पोलिसात धाव घेतली.