वैभव गायकर,
पनवेल : राज्यात दोन दिवसांपूर्वी लसीकरणाला सुरुवात झाली. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातही हे लसीकरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात २०० जणांना कोविशिल्ड लस देण्यात आली. मात्र, यापैकी ११ जणांना या लसीचा त्रास झाला असून, २ महिला कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी एमजीएम रुग्णालय व येरळा आयुर्वेदिक महाविद्यालयात या लसीकरणाला उत्साहात सुरुवात झाली. या लसीकरणाच्या वेळी शासनाच्या कोविड लसीकरणाकरिता तयार करण्यात आलेल्या ॲपमध्येही तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसून आले. मात्र, या लसीकरणाचा बहुतांशी जणांना त्रास झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी ११ जणांची पालिकेकडे नोंद करण्यात आली आहे. यामध्ये बहुतांशी महिलांचा समावेश आहे. दोन महिलांना जास्त त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळही आली आहे.
या लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी काही लोकांना त्रास जाणवायला लागले. यामध्ये ताप, उलट्या आणि अंगदुखीचा त्रास काहींना जाणवला. पालिकेकडे एकूण ५,२३५ जणांनी लसीकरणासाठीआपली नावे नोंदविली आहेत. पहिल्या टप्प्यात २०० जणांना लस देण्यातआल्यानंतर ॲपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे लसीकरण थांबविण्यात आले. पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद गोसावी यांनीही ११ जणांना लसीकरणाचा त्रास झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
अकरा जणांना किरकोळ स्वरूपाचा त्रास आहे. ताप, अंगदुखी आणि काहींना उलट्या झाल्याचे निदर्शनास आले. २ महिला कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एका महिला कर्मचाऱ्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. उर्वरित सर्वांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे.
- संजय शिंदे, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका