मुंबई : आरबीआयच्या अधिकृत ईमेल आयडीवर खिलाफत इंडिया या मेलआयडीवरून आलेल्या धमकीचा मेल प्रकरणात गुजरात कनेक्शन उघड होताच, गुन्हे शाखेने तिघांना बडोदामधून ताब्यात घेतले आहे. फक्त त्रास देण्यासाठी त्यांनी तो मेल पाठवला असून तिघांकडे अधिक तपास सुरु आहे. तिघांना पुढील चौकशीसाठी एमआरए मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शाखेने याप्रकरणी ईमेल आयडी क्रियेट करून पाठवणाऱ्या मोहम्मद अरशील मोहम्मद इकबाल टोपला (२७) याला बडोदा मधून अटक केली. त्याने बॅचलर्स ऑफ बिझनेस अँडमिनिस्ट्रेशन (बीबीए) मधून पदवी घेतली आहे. तो शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचे काम करतो. त्याच्यासह त्याचा मेहुणा वसीमराजा अब्दुलरझाक मेमन (३५) आणि त्याचा मित्र आदिल भाई मलिक (२३) यांनाही अटक करण्यात आली आहे. मेमन पान टपरी चालवतो तर मलिकचा अंडे विक्रीचे दुकान आहे. मलिकने बनावट कागदपत्रांवर मिळवलेले सिमकार्ड मेमनकडे दिले. मेमनने हे सिमकार्ड टोपला याला दिले. पुढे याच सिमकार्डच्या मदतीने फेक आयडी बनवून मेल पाठवण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात आरोपीं खोडसाळपणा म्हणून ई-मेल पाठवल्याचे सांगितले. त्यामागे कोणताही गुप्त हेतू अद्याप समोर आला नसून अधिक तपास सुरु असल्याचे गुन्हे शाखेने सांगितले. तिघांना एमआरए मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यानुसार अटक दाखवून पुढील तपास सुरु आहे. आरोपींनी मंगळवारी सकाळी १०.५० च्या सुमारास खिलाफत इंडिया या ईमेलवरून आरबीआयच्या अधिकृत ईमेलवर धमकीचा मेल पाठवला होता. या मेलमध्ये मुंबईमध्ये ११ वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे नमूद होते. आरबीआयसह खासगी बँकांनी भारतातील सर्वात मोठा घोटाळा केला आहे.
यामध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, बँकिंग क्षेत्रातील काही उच्चपदस्थ अधिकारी आणि काही जणांना समावेश आहे. यामध्ये संबंधितांनी राजीनामा देऊन घोटाळा केल्याचे मान्य करावा. अन्यथा फोर्टच्या आरबीआय बँक, चर्चगेटच्या एचडीएफसी हाऊस, बीकेसीतील आयसीआयसीआय टॉवर येथे तीन बॉम्ब स्फोट करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये त्यांना दीड वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच तात्काळ वरिष्ठांच्या आदेशाने आरबीआयचे प्रमुख सुरक्षा रक्षक संजय हरिशचंद्र पवार (५९) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकांनी तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने आरोपीना अवघ्या काही तासातच ताब्यात घेत कारवाई केली आहे.