बँडस्टॅन्ड येथे बुडणाऱ्या ११ जणांचे जीव वाचविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 04:49 AM2018-04-05T04:49:51+5:302018-04-05T04:49:51+5:30
- वांद्रे बँटस्टॅन्ड समुद्रात बुडणा-या ११ जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. वांद्रे पोलीस या बुडणाºया तरुणांसाठी अक्षरश: देवदूत ठरले.
मुंबई - वांद्रे बँटस्टॅन्ड समुद्रात बुडणाºया ११ जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. वांद्रे पोलीस या बुडणाºया तरुणांसाठी अक्षरश: देवदूत ठरले.
बँडस्टँडवर मंगळवारी दुपारी काही महाविद्यालयीन तरूण आणि तरुणी गप्पा मारत बसले होते. याच दरम्यान समुद्राला आलेली भरती त्यांच्या लक्षात आली नाही आणि ते पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. काही जणांनी समुद्रात उडी मारत किनारा गाठला तर काही जण आतच अडकले. चार तरुणींचा समावेश असलेले अकरा जण या पाण्यात अडकले आणि मदतीसाठी आरडाओरडा करु लागले. कोणीतरी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याबाबत कळवले. वांद्रे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्वांना खडकावरच उभे राहण्याची सूचना केली. त्याचवेळी अजित शिंदे, समीर भोईर आणि नंदू बाळ शिंदे या सागरी बोटीवरील तैनात पोलिसांनी समुद्रात उड्या मारल्या आणि ११ मुलांना सुखरूप बाहेर काढले.
या सर्वांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्या पालकांनादेखील याबाबत कळविण्यात आले. मृत्यूच्या दाढेतून पोलिसांनी आमच्या मुलांना बाहेर काढले, ते आमच्यासाठी देवदूतच आहेत, अशी प्रतिक्रिया मुलांच्या पालकांनी दिली आहे.
त्यांना किरकोळ उपचार करुन रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आल्याचे वांद्रे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मुत्युचा हा थरार पाहण्यासाठी समुद्र किनारी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.