पंधरा वर्षांत ११ हजार आरोपींना अटक
By admin | Published: September 29, 2015 01:40 AM2015-09-29T01:40:46+5:302015-09-29T01:40:46+5:30
खून, चोऱ्या, दरोडे यामुळे उपनगरीय लोकलचा प्रवास सुरक्षित आहे की नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रेल्वेत गुन्हे घडत असतानाही गुन्ह्यांची उकल तर होत
मुंबई : खून, चोऱ्या, दरोडे यामुळे उपनगरीय लोकलचा प्रवास सुरक्षित आहे की नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रेल्वेत गुन्हे घडत असतानाही गुन्ह्यांची उकल तर होत नाहीच शिवाय गुन्हेगारांनाही अटक होत नाही, अशी ओरड प्रवाशांकडून केली जाते. पण गेल्या पंधरा वर्षांत तब्बल ११ हजार गुन्हेगारांना
विविध गुन्ह्यांखाली अटक करण्यात आली असल्याची माहिती
रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे रेल्वेत गुन्हेगारांचा हैदोस जरी सुरू असला तरी पोलिसांकडून कामगिरी बजावली जात असल्याचे दिसून येते.
मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाइनचा पसारा हा सीएसटीपासून कर्जत, कसारा, खोपोलीपर्यंत, हार्बरचा पनवेल, वाशी तर पश्चिम रेल्वेचा पसारा हा चर्चगेट ते डहाणूपर्यंत पसरलेला आहे. या मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जवळपास साडेतीन हजार पोलीस तैनात असतात.
दिवसाला ८0 लाख प्रवासी आणि साडेतीन हजार पोलिसांचा फौजफाटा पाहता तो कमीच असल्याचे दिसून येते. तरीही
पोलीस आपली कामगिरी बजावतात. गेल्या काही वर्षांत रेल्वेच्या
उपनगरीय स्थानकांवर चोऱ्या, खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडे,
जबर मारहाणीचे गुन्हे घडले
आहेत.
गेल्या पंधरा वर्षांत अशा गुन्ह्यांचा शोध घेताना तब्बल अकरा हजार गुन्हेगारांना अटक करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांतील सूत्रांकडून देण्यात आली.
मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील सीएसटी, भायखळा, दादर, कुर्ला, भांडुप, ठाणे, कल्याण, हार्बरवर वडाळा, टिळक नगर, गोवंडी, सॅन्डहर्स्ट रोड, वाशी, पनवेल, वांद्रे आणि पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, मरिन लाइन्स, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, विरार या स्थानकांत गुन्हेगारीचे प्रमाण जास्त असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
------------
४६ स्थानके सीसीटीव्हींच्या प्रतीक्षेत
एकूण १३६ उपनगरीय स्थानकांपैकी (यात सहा टर्मिनसचा समावेश आहे) ४६ स्थानके सीसीटीव्हींच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही नसलेल्या स्थानकांवर गुन्हा घडल्यास तपास करायचा कसा, असा प्रश्न पडल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. मध्य रेल्वेमार्गावरील ३६ तर पश्चिम रेल्वेमार्गावरील १० स्थानकांचा यात समावेश आहे.
सीसीटीव्ही नसलेली स्थानके
मध्य रेल्वे - दिवा टर्मिनस, निळजे, तळोजा, कळंबोली, दातीवली, नावडे रोड, ऐरोली, कोपर रोड अपर, भिवंडी, खारबांव, कामन, जुचंद्र, शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वासिंद, आसनगाव, आटगांव, खर्डी, कसारा, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी, पळसदरी, केळवली, डोलवली, लवजी, खोपोली, जुम्मापट्टी, वॉटरपाइप, अमन लॉज, माथेरान.
पश्चिम रेल्वे - वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उपरोळी, बोईसर, वानगाव, डहाणू रोड, घोलवड, बोर्डी रोड.
खून, खुनाचा प्रयत्न, चोऱ्या, छेडछाड, बलात्कार, हाणामारी यासह मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी मुंबईतील उपनगरीय रेल्वेत वाढल्याचे समोर आले आहे.