११ हजार कोटींचे जमीन व्यवहार; महामुंबईत विक्रमी खरेदी विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 12:39 PM2023-09-30T12:39:47+5:302023-09-30T12:39:57+5:30
९ महिन्यांत महामुंबईत विक्रमी खरेदी विक्री; मुंबईचा वाटा सर्वाधिक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चालू वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत मुंबई व महामुंबई परिसरात तब्बल ११ हजार ९१ कोटी रुपये मूल्याचे जमिनींचे व्यवहार झाले. हा देशातील आजवरचा विक्रम ठरला आहे. यामध्ये मुंबईचा वाटा सर्वाधिक असून गेल्या नऊ महिन्यांत मुंबई व उपनगरांत एकूण ७९५६ कोटी रुपयांचे जमीन व्यवहार झाले.
महामुंबई परिसरातील जमीन व्यवहारासंदर्भात काम करणाऱ्या एका संस्थेने या संदर्भात माहिती प्रसिद्ध केली आहे. यानुसार मुंबईती जमिनीच्या किमती देशात सर्वांत विक्रमी असल्यामुळे तिथे ७९५६ कोटी रुपये इतक्या विक्रमी किमतीचे व्यवहार झाले आहेत. त्या पाठोपाठ ठाणे जिल्ह्याचा क्रमांक असून ठाणे जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांत एकूण २७७८ कोटी रुपयांचे जमीन व्यवहार झाले आहेत. विशेष म्हणजे, मुंबईच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यातील उलाढालीचा आकडा कमी असला तरी प्रत्यक्ष व्यवहारांची संख्या मात्र मुंबईपेक्षा तिप्पट आहे. रायगड जिल्ह्यामध्ये या कालावधीमध्ये २६५ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत, तर पालघर जिल्ह्यामध्ये ९२ कोटी रुपयांचे जमीन व्यवहार झाले.
मुंबईची कामगिरी...
अलीकडेच मुंबईच्या वरळी येथील बॉम्ब डाईंग मिलच्या २२ एकर जागेचा सौदा विक्रमी ४६७४ कोटी रुपयांना झाला.
या एकाच व्यवहारामुळे मुंबईच्या जमीन व्यवहारांच्या उलाढालीत विक्रमी
वाढ झाली.
त्या पाठोपाठ एका अग्रगण्य बांधकाम समूहाने मध्य-मुंबईतील एक जमीन ७०४ कोटी रुपयांना खरेदी केली.
जूनमध्ये अंधेरी येथील २० एकरचा एक भूखंडही ५०० कोटी रुपयांना विकला गेला.
भांडुप येथील ७ एकर जागा एका प्रमुख उद्योग समूहाने २७४ कोटी रुपयांना विकला.
ठाण्याची कामगिरी...
गेल्या नऊ महिन्यांत ठाण्यात एकूण मोठ्या जमिनींचे एकूण ६० व्यवहार झाले.
ठाण्यातील मुकुंद कंपनीची ४२ एकरची जागा तब्बल ७२७ कोटी रुपयांना विकली गेल्याचे समजते.
चालू वर्षातील ठाणे जिल्ह्यातील हा सर्वांत मोठा सौदा मानला जात आहे.