Join us

महापालिकेच्या तिजोरीत ११ हजार कोटींची भर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 1:23 PM

नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात मुंबई महापालिकेच्या माध्यमातून संगीत कारंजे साकारण्यात येईल.

लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबई : मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. त्याचबरोबर देशाची आर्थिक राजधानीही आहे. मुंबईत परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यानुसार मुंबई शहराचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्याबरोबर मुंबई महापालिकेच्या तिजोरीत ११ हजार कोटींची भर पडली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

संघर्षनगर, चांदिवली, साकीनाका येथे महापालिकेच्या माध्यमातून ४०० कोटी रुपयांच्या खर्चातून बांधण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी इस्पितळ आणि क्रीडा संकुलाचा पायाभरणी व भूमिपूजन सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी आमदार दिलीप लांडे, आमदार भरत गोगावले उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात मुंबई महापालिकेच्या माध्यमातून संगीत कारंजे साकारण्यात येईल. संघर्षनगर परिसरात मूलभूत सोयीसुविधा पुरवून ते सुंदरनगर करण्यात येईल. असल्फा व्हीलेज येथील ४८ कुटुंबांसाठी खोल्या उपलब्ध करून देण्यात येतील. तर दिलीप लांडे म्हणाले, चांदिवलीचा विकास घडवून आणणार आहे. शिधा वितरण कार्यालय लवकरच कार्यान्वित करण्यात येईल.

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाएकनाथ शिंदे