११ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश
By admin | Published: July 30, 2016 04:19 AM2016-07-30T04:19:35+5:302016-07-30T04:19:35+5:30
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना
मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना मेसेज पाठवले होते. त्यापैकी एकूण ११ हजार ८३० विद्यार्थ्यांनी बुधवार व गुरुवार या दोन दिवसांत महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला आहे. तर अर्धवट नोंदणी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन नोंदणी अर्ज करण्यास शनिवारी, ३० जुलैपासून सुरुवात होत आहे.
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत अर्धवट नोंदणी अर्ज भरलेले आणि अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी शनिवारपासून आॅनलाइन नोंदणीला पुन्हा सुरुवात होत आहे. याआधी यशस्वीरीत्या अर्ज भरलेल्या आणि महाविद्यालयांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीत नोंदणी करता येणार नाही. केवळ नोंदणी अर्ज अर्धवट भरलेल्या आणि याआधी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांनाच या फेरीचा फायदा होणार आहे. ३० जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज भरून नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ४ आॅगस्टला गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, त्यांना ९ आॅगस्ट रोजी नव्याने नोंदणी करण्याची संधी आहे.
दरम्यान, चारही गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतरही प्रवेशास मुकलेल्या विद्यार्थ्यांना बुधवार आणि गुरुवारी प्रवेशाची आणखी एक संधी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली होती. त्यासाठी गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतरही प्रवेशास मुकलेल्या ७० हजार विद्यार्थ्यांपैकी ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना प्रशासनाने मेसेज पाठवत रिक्त जागेवर प्रवेशाची संधी दिली. मात्र प्रवेश मिळालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ८३० विद्यार्थ्यांनीच महाविद्यालयात प्रवेश निश्चित केल्याने ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला नाही, त्यांनी ९ आॅगस्टला विशेष फेरीत नव्याने नोंदणी करावी. (प्रतिनिधी)
- मुंबई महानगर क्षेत्रातील महाविद्यालयांतील अकरावीच्या वर्गात आॅनलाइन प्रवेश घेण्यासाठी आतापर्यंत चार गुणवत्ता यादी जाहीर झाल्या आहेत. तर नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी बुधवार व गुरुवारी पाचवी विशेष फेरी राबवण्यात आली.
अशा प्रकारे पार पडलेल्या पाच फेऱ्यांमध्ये एकूण १ लाख २३ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश निश्चित केलेले आहेत.
मेसेज आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश निश्चित केलेल्या नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांची आकडेवारी
बोर्डविद्यार्थी
एसएससी११,२५९
सीबीएसई२११
आयसीएसई२४८
आयबी०
आयजीसीएसई३१
एनआयओएस२२
इतर५९
एकूण११,८३०