Join us

११ वर्षांच्या ‘हिरकणी’ने सर केला हडबीच्या शेंडीचा सुळका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 4:14 AM

गोरेगाव पूर्वेकडील सन्मित्र मंडळ विद्यामंदिर येथे इयत्ता सहावीत शिकणारी अक्षता होरंबे हिने १५० फूट उंचीचा मनमाड येथील हडबीच्या शेंडीचा सुळका नुकताच सर केला.

मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील सन्मित्र मंडळ विद्यामंदिर येथे इयत्ता सहावीत शिकणारी अक्षता होरंबे हिने १५० फूट उंचीचा मनमाड येथील हडबीच्या शेंडीचा सुळका नुकताच सर केला. अक्षता ११ वर्षांची आहे़ तिला ‘हिरकणी’ या नावाने ओळखले जात आहे. नुकताच अक्षताला ‘माता राजमाता जिजाऊ पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. एवढ्या कमी वयात आणि कठीण अशा समजल्या जाणाऱ्या सुळक्यावर प्रथमच छोट्या मुलीने प्रस्तरारोहण केले असल्यामुळे गिर्यारोहकांकडून तिचे कौतुक केले जात आहे.अक्षताचे वडील महाराष्ट्र सुरक्षा बलात कार्यरत असून ते स्वत: एक उत्तम गिर्यारोहक, समाजसेवक आणि सर्पमित्र असल्यामुळे तिचीही पावले आपसूकच आपल्या वडिलांबरोबर या क्षेत्रात वळू लागली. शाळेत अभ्यासाबरोबर अक्षताने कराटे खेळत उत्तम प्रगती केली असून तिने आतापर्यंत वेगवेगळ्या खेळांत प्रथम क्रमांकावर बाजी मारत सुवर्णपदके, रौप्यपदके, कांस्यपदके पटकावली आहेत. खेळातील अनुभव आणि गिर्यारोहणाची जिद्द यामुळे तिने पहिल्यांदा वडिलांसोबत वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी हडबीची शेंडी हा १५० फुटांचा सुळका माथा गाठून त्यावर तिरंगा यशस्वीरीत्या फडकावला.यापूर्वीही तिने आपल्या वडिलांसोबत टकमक, त्रिंगलवाडी, कोहोज, कळसुबाई, गंभीरगड, लेण्याद्री ते हटकेश्वर इत्यादी ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. या वेळी तिला पॉइंट ब्रेक अडव्हेंचर ग्रुपचे मार्गदर्शन मिळाले. याशिवाय सहकारी दीप नाचनकर, सिद्धेश आणि श्रद्धा बेडिस्कर, शुभम चित्ते, प्रज्ञानंद कदम यांचे प्रोत्साहन मिळाले. १ डिसेंबर रोजी अक्षताला महात्मा गांधी दर्शन पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती अक्षता होरंबेचे वडील सुनील होरंबे यांनी दिली.

टॅग्स :मुंबईट्रेकिंग