Join us

ठाणे जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसह पंचायत समित्यांचे ११० गण निश्चित!

By admin | Published: November 03, 2014 11:30 PM

जिल्हा विभाजनानंतर बरखास्त झालेली ठाणे जिल्हा परिषद अस्तित्वात आणण्यासाठी जिल्हाभरात ५५ गट निर्माण करण्यात आले असून पाच पंचायत समित्यांसाठी ११० गणांची निर्मिती करण्यात आली आहे.

सुरेश लोखंडे, ठाणेजिल्हा विभाजनानंतर बरखास्त झालेली ठाणे जिल्हा परिषद अस्तित्वात आणण्यासाठी जिल्हाभरात ५५ गट निर्माण करण्यात आले असून पाच पंचायत समित्यांसाठी ११० गणांची निर्मिती करण्यात आली आहे.ठाणे जिल्हा विभाजनानंतर पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. यानंतर, ठाणे जिल्हा परिषद बरखास्त झाली आहे. ठाण्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्याची घोषणा होताच ठाणे व पालघर या जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांची नव्याने स्थापना झाल्याची अधिसूचना ग्रामविकास विभागाने जारी केली आहे. यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या ६६ सदस्यांसह १३ पंचायत समित्यांच्या १३२ सदस्यांचे सदस्यत्वही संपुष्टात आले आहे. पण, या दोन्ही जिल्हा परिषदांच्या प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी सध्या संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांद्वारे ‘प्रशासक’ म्हणून सांभाळली जात आहे. यामुळे सहा महिन्यांच्या कालावधीत म्हणजे ३१ जानेवारीपर्यंत ठाणे जिल्हा परिषद अस्तित्वात येणे अपेक्षित आहे. यानुसार, लवकरच निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यासाठी नवनिर्वाचित जिल्हा परिषदेसाठी ५५ गट निर्माण करण्यात आले आहेत, तर शिल्लक असलेल्या भिवंडी, शहापूर, कल्याण, अंबरनाथ आणि मुरबाड या पाच पंचायत समित्यांसाठी ११० गणांची निर्मिती करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे व उल्हासनगर हे शहरी दोन तालुके वगळता उर्वरित पाच तालुक्यांत पंचायत समित्यांचे कार्यक्षेत्र आहे. ठाणे जिल्हा परिषदेसह तिच्या नियंत्रणातील या पाच पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका बरखास्तीनंतर सुमारे सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी गटांसह, गणांची निर्मिती करण्यात आली आहे. यानुसार, ठाणे जिल्हा परिषदेचे ५५ सदस्य तर पंचायत समित्यांच्या ११० सदस्यांसाठी लवकरच निवडणूक घेतली जाणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुमारे १४ लाख सात हजार ८२८ लोकसंख्येस अनुसरून गट व गणांची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या या ५५ गटांसह ११० गणांची जातीनिहाय आरक्षण सोडत १० व ११ नोव्हेंबर या कालावधीत काढण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून नमूद करण्यात आले आहे. यापैकी जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्येच्या भिवंडी तालुक्यात १७ गटांची निर्मिती करण्यात आली आहे. सर्वात कमी लोकसंख्येच्याअंबरनाथ तालुक्यात सर्वात कमी पाच गटांची निर्मिती करण्यात आली आहे.