110 वर्षांचे ‘कॉलेज ऑफ फिजिशियन्स ॲण्ड सर्जन’!

By संतोष आंधळे | Published: November 14, 2022 12:36 PM2022-11-14T12:36:52+5:302022-11-14T12:37:34+5:30

College of Physicians and Surgeons : काळाच्या पटलावर ज्या संस्थांनी आपल्या अस्तित्वाची वीण भक्कम केली अन् उत्तरोत्तर त्या माध्यमातून लोकोपयोगी कार्य वाढवत नेले, अशा संस्थांच्या यादीमधे मुंबईच्या परळ भागात असलेल्या ‘कॉलेज ऑफ फिजिशियन्स ॲण्ड सर्जन’ या संस्थेचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.

110 years of 'College of Physicians and Surgeons'! | 110 वर्षांचे ‘कॉलेज ऑफ फिजिशियन्स ॲण्ड सर्जन’!

110 वर्षांचे ‘कॉलेज ऑफ फिजिशियन्स ॲण्ड सर्जन’!

googlenewsNext

- संताेष आंधळे
विशेष प्रतिनिधी
काळाच्या पटलावर ज्या संस्थांनी आपल्या अस्तित्वाची वीण भक्कम केली अन् उत्तरोत्तर त्या माध्यमातून लोकोपयोगी कार्य वाढवत नेले, अशा संस्थांच्या यादीमधे मुंबईच्या परळ भागात असलेल्या ‘कॉलेज ऑफ फिजिशियन्स ॲण्ड सर्जन’ या संस्थेचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. १९१२ साली अर्थात ब्रिटीश राजवटीत तत्कालीन संसदेने पारित केलेल्या कायद्यान्वये संस्थेची स्थापना झाली. भारतात वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार करतानाच त्या माध्यमातून उत्तम, दर्जेदार वैद्यकीय सेवा जनतेला उपलब्ध व्हावी, या हेतूने सर्जन जनरल एच.डब्ल्यू. स्टीव्हनसन यांनी संस्थेची स्थापना केली. त्यावेळी सर्जन जनरल हे वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांत प्रमुख 
पद होते.
वैद्यकीय शाखांतील जवळपास सर्वच उपशाखांतील शिक्षण येथे विद्यार्थांना दिले जाते. स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नेत्र तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, अस्थिव्यंग तज्ज्ञ अशा जवळपास २४ शाखांतील शिक्षण विद्यार्थ्यांना घेता येते. यातील १० अभ्यासक्रमांना केंद्राची मान्यता असून १४ अभ्यासक्रमांना राज्य शासनाची परवानगी आहे. राज्यभरातील जिल्हा सरकारी रुग्णालये, तसेच महापालिका रुग्णालये (जिथे वैद्यकीय महाविद्यालय नाही) अशा ठिकाणी हा कोर्स चालविला जातो.  विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग देण्याकडे अधिक भर देण्यात आला आहे. दोन वर्षांचा हा पदविका अभ्यासक्रम आहे. 
 ना नफा- ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या या संस्थेचा पसारा गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. आजच्या घडीला महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, त्रिपुरा, मेघालय, कर्नाटक अशी नऊ राज्ये आणि दादरा- नगर हवेली केंद्रशासित प्रदेश अशा दहा ठिकाणी अभ्यासक्रम चालविला जातो. आता वर्षाला ४,००० विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार हाेते.

संस्थेच्या माध्यमातून दिले जाणारे शिक्षणाचे मॉडेल पाहून, १९७८ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिल्लीमध्ये, कॉलेज ऑफ फिजिशीयन्स ॲण्ड सर्जनच्या धर्तीवर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशची स्थापना केली. याद्वारे डी.एन.बी. ही पदविका दिली जाते. 

मंत्री डॉ. भागवत कराड संस्थेचेच माजी विद्यार्थी
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनीदेखील या संस्थेतूनच आपले पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. याखेरीज डॉ. संजय ओक, डॉ. सुलतान प्रधान, डॉ. अविनाश सुपे, डॉ. आर.एन. कूपर असे अनेक नामवंत डॉक्टर संस्थेचे माजी विद्यार्थी होते. संस्थेचे देशभरात एकूण ४५ हजार माजी विद्यार्थी आहेत. 

सध्या चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आतापर्यंत ४५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या संस्थेत शिक्षण घेतले आहे. ग्रामीण भागात याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. मी संस्थेचा विद्यार्थी आहे. ज्या संस्थेने आपल्याला घडवले, त्याचे आपण देणे लागतो. त्याची उतराई करण्याचा हा प्रयत्न आहे. संस्थेला आता देशव्यापी पातळीवर पोहोचविण्याचा आमचा मानस आहे. 
- डॉ. गिरीश मैंदरकर, अध्यक्ष, कॉलेज ऑफ फिजिशियन्स ॲण्ड सर्जन

Web Title: 110 years of 'College of Physicians and Surgeons'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.