मुंबईतील १,१०६ आरटीई प्रवेश निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 06:43 AM2019-04-18T06:43:58+5:302019-04-18T06:44:10+5:30
बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार (आरटीई) समाजातील दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत २५ टक्के आरक्षण देण्यात येते.
मुंबई : बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार (आरटीई) समाजातील दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत २५ टक्के आरक्षण देण्यात येते. आरटीई सोडतीत मुंबईतील ३ हजार ५३२ विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली असून कागदपत्रांची पडताळणी करून यातील १,१०६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. अद्याप २४१३ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी असून १३ अर्ज बाद झाले आहेत.
आरटीई प्रवेशांतर्गत राज्यस्तरावर ८ एप्रिलला काढण्यात आलेल्या सोडतीत मुंबईतील ३ हजार ५३२ विद्यार्थ्यांची नावे १० एप्रिलला जाहीर करण्यात आली. यातील २५२ विद्यार्थ्यांनी राज्य मंडळाच्या तर ८२ विद्यार्थ्यांनी अन्य मंडळांच्या शाळेमध्ये पहिल्या दोन दिवसांत कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित केला. उर्वरित विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असून, २० एप्रिलपर्यंत त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
पालकांकडून ‘एडिट’च्या पर्यायाची मागणी
आरटीई प्रवेशाच्या संकेतस्थळावर पालकांनी केलेल्या अर्जात काही बदल करायचा झाल्यास पूर्वी असा बदल करता येत होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून ‘एडिट’अंतर्गत ही सुविधा उपलब्ध नाही. स्पेलिंगमध्ये चूक, नावाची अदलाबदल अशा काही तक्रारी असलेल्या बालकांचे अर्ज कागदपत्रे असूनही नाकारले जात आहेत. त्यामुळे ‘एडिट’चा पर्याय पुन्हा सुरू करण्यात यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.
एखाद्या घटस्फोटितेकडे पतीचे जात प्रमाणपत्र नसेल तर पडताळणी समिती तिच्या पाल्याला प्रवेश देण्यास नकार देते. या व अशा अन्य कारणांमुळे कागदपत्रे जमा करण्यात पालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत असल्याची टीका अनुदानित शिक्षा बचाव संघटनेकडून करण्यात आली आहे.