मुंबई :
मुंबई महापालिकेने सी-१ श्रेणीतील म्हणजेच अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असून ही संख्या २१६ आहे. मागील वर्षीपर्यंत ही संख्या ४८९ इतकी होती. या २१६ इमारतींपैकी ११० इमारतींशी संबंधित प्रकरणे न्यायालयात आहेत. तर, नऊ इमारतींची प्रकरणे तांत्रिक सल्लागार समितीकडे आहेत. त्यामुळे उर्वरित ९७ इमारती पावसाळ्यापूर्वी रिकाम्या करून पाडून टाकण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सर्वाधिक ११४ इमारती पश्चिम उपनगरात आहेत. तर, शहर भागातील ३६ आणि पूर्व उपनगरातील ६६ इमारतींचा यात समावेश आहे. गेल्यावर्षी इमारत दुर्घटनेत झालेल्या मनुष्यहानीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने धोकादायक इमारती पाडण्यासाठी कार्यपद्धती सुरू केली. त्यानुसार महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईतील घरांची, जागांची तपासणी करून त्यांची धोकादायक आणि अतिधोकादायक श्रेणी निश्चित केली जाते.
शहर, उपनगरातील सर्व खासगी आणि महापालिकेच्या मालकीच्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. त्यात ज्या इमारती तत्काळ पाडून टाकणे आवश्यक आहे, अशा इमारती ‘सी-वन’ या प्रकारात अर्थात अतिधोकादायक म्हणून गणल्या जातात. यंदा मुंबईतील निवासी व अनिवासी इमारतींचे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. तपासणीअंती मुंबईत ‘सी-१’ श्रेणीतील २१६ इमारती अतिधोकादायक आणि मोडकळीस आलेल्या स्वरूपातील असल्याचे आढळले आहे.
३५४ ची नोटीस कोणाला?महापालिकेच्या धोरणानुसार ३० वर्षे जुन्या इमारतींची संरचनात्मक तपासणी केली जाते. त्यात ज्या इमारती धोकादायक आढळतात, अशा इमारतींना घरे रिकामी करण्यासाठी ३५४ ची नोटीस बजावली जाते. त्यानुसार यंदाही धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले आहे.
२२ एच. प. (वांद्रे)२१ के. पूर्व (जोगेश्वरी, अंधेरी पू.)२२ के. पश्चिम (विलेपार्ले, अंधेरी प.)२१ टी - (मुलुंड)