११४ गिरणी कामगार, वारसांना चाव्यांचे वाटप; आजतागायत १२१० चाव्या दिल्या
By सचिन लुंगसे | Published: October 20, 2023 06:54 PM2023-10-20T18:54:47+5:302023-10-20T18:55:52+5:30
११४ गिरणी कामगार / वारस यांना सहाव्या टप्प्यांतर्गत सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे २०२० मध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर केलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र ११४ गिरणी कामगार / वारस यांना सहाव्या टप्प्यांतर्गत सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, सहमुख्य अधिकारी नीलिमा धायगुडे, उपमुख्य अधिकारी योगेश महाजन उपस्थित होते.
सुनील राणे म्हणाले की, आतापर्यंत २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र व सदनिकेच्या विक्री किंमतीचा, मुद्रांक शुल्काचा भरणा केलेल्या १२१० गिरणी कामगारांना १५ जुलै, २०२३ पासून सहा टप्प्यांत सदनिकांच्या चावीचे वाटप करण्यात आले आहे. आजच्या सहाव्या टप्प्यातील कार्यक्रमाच्या माध्यमातून विजयादशमी व नवरात्रीच्या मुहूर्तावर स्वतःच्या हक्काच्या घरात प्रवेश करण्याची सुवर्णसंधी गिरणी कामगार / वारस यांना मिळाली असून याबद्दल समाधान वाटत राणे यांनी सांगितले. उर्वरित गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीचे काम वेगाने सुरू असून विक्री किंमतीचा व मुद्रांक शुल्क भरणा भरणा केलेल्या पात्र गिरणी कामगारांना दिवाळीच्या सुमारास सदनिकांच्या चावीचे वाटप केले जाईल, असे सुनील राणे यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील मौजे कोन येथील एमएमआरडीएने बांधलेल्या सदनिकांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते सोडतीतील विजेत्या पात्र गिरणी कामगार / वारसांना पहिल्या टप्प्यांतर्गत इमारत क्रमांक ३ व ४ मधील २०० सदनिकांच्या चाव्यांचे वाटप दिवाळीच्या सुमारास करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सुनील राणे यांनी सांगितले. मुंबई मंडळ व कामगार विभाग यांच्यातर्फे सोडतीतील उर्वरित गिरणी कामगार / वारस यांची पात्रता निश्चित करण्याचे काम वेगात सुरू आहे. या गिरणी कामगार / वारस यांची पात्रता लवकर निश्चित करून त्यांना सदनिकांच्या चाव्या देण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार सुनील राणे यांनी सांगितले.
मिलिंद बोरीकर यांनी माहिती दिली की, बृहन्मुंबईतील ५८ बंद / आजारी गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता कालबद्ध विशेष अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत ऑफलाइन कागदपत्रे वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉल येथे सुरू आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने www.millworkereligibility.mhada.gov.in या संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा विनामूल्य उपलब्ध असून ॲण्ड्रोइड व्हर्जनच्या मोबाईलमध्ये गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि आयओएस व्हर्जन ॲप स्टोअरमध्ये mill workers eligibility या नावाने ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. आतापर्यंत ४३,२०० गिरणी कामगार / वारसांनी ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर केले असून ९७३९ गिरणी कामगारांनी ऑफलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर केली असल्याचे बोरीकर यांनी सांगितले. गिरणी कामगार / वारसांनी ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन बोरीकर यांनी याप्रसंगी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिळकत व्यवस्थापक रामचंद्र भोसले आदींसह अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.