सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहरासह मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील आरे कॉलनीसह लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वादळी वारे, पावसाने धिंगाणा घातला. सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत मुंबईत वाऱ्याचा सर्वाधिक वेग हा कुलाबा येथील अफगाण चर्च येथे नोंदविण्यात आला. येथे सव्वा बाराच्या सुमारास ताशी १११ कि.मी. वेगाने वारे वाहिले, तर दुपारी दोन वाजता हाच वेग ताशी ११४ कि.मी. एवढा नोंदविण्यात आला.
नरिमन पॉइंट, भायखळा, वरळी, दादर, विलेपार्ले, गोरेगाव, विक्रोळी, भांडूप, कुर्ला, बीकेसी, घाटकोपर, साकीनाका, अंधेरी आणि सायन परिसरात दुपारी पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी १० वाजेपर्यंत १३२ ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. सहा ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. सकाळी ११.३० पर्यंत कुलाबा येथे ७९, तर सांताक्रुझ येथे ४४ मि.मी. पावसाची नोंद झाली. दुपारी पावणेचार वाजता आलेल्या भरतीने सखल भागात पाणी साचले. संध्याकाळी पाच वाजले तरी वरळी, दादर, कांदिवली, चिंचोली, मालवणी, दहिसर, गोरेगाव, भांडूप येथे पावसाचा धिंगाणा सुरूच होता.
........................................