‘ट्रान्स हार्बर लिंक’साठी ११४ खांबांच्या पायाचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 05:22 AM2019-05-20T05:22:19+5:302019-05-20T05:22:22+5:30
एमएमआरडीए : २०२२ सालापर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस
मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी-न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी ११४ खांब उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. या सर्व खांबांच्या पायाचे बांधकाम पूर्ण झाल्याने या २२ कि.मी. लांब मार्गिकेच्या कामाला गती मिळणार आहे. तसेच शिवडी दिशेने पहिला आठ मीटर उंचीचा खांब शनिवारी बांधून पूर्ण झाला असून, २०२२ सालापर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.
या प्रकल्पासाठी १७ हजार ८४३ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. राज्यातील सर्वात लांब पल्ल्याचा पुलाची समुद्रातील लांबी १६.५ कि.मी. इतकी असून, जमिनीवरील पुलाची लांबी ५.५ कि.मी. असणार आहे. नवी मुंबई विमानतळ आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे यांना हा सहा पदरी पूल जोडणार आहे.
या प्रकल्पामुळे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांचा विकास होणार असून, मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होणार आहे. ट्रान्स हार्बर लिंक रोडमुळे मुंबई, नवीमुंबई आणि कोकण यातील अंतर कमी होणार असल्याने इंधन आणि वाहतूक खर्चात बचत होणार आहे. एमएमआरडीएतर्फे या प्रकल्पाच्या उभारणीसाठी जायकाकडून कर्ज घेण्यात येणार आहे. या मार्गिकेचे काम तीन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे.
समुद्रात ५०० खांब उभारणार
हा पूल उभारण्यासाठी पाण्यामध्ये १६ कि.मी. अंतरावर पाचशेपेक्षा अधिक खांबांचा आधार घेतला जाणार आहे. समुद्रामध्ये काही ठिकाणी तेल कंपन्यांनी पाईप लाईन टाकली असल्याने, या मार्गिकेचे काम सुरू करण्यापूर्वी पाणबुड्यांच्या सहाय्याने पाण्याच्या खालून सर्वेक्षण करण्यात आले होते. पाणबुड्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर समुद्रामध्ये पाईलिंगचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएने दिली.