मुंबई : गणेशोत्सवात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेकडून विशेष फेऱ्या सोडण्यात येतात. काही विशेष फेऱ्यांची घोषणा केलेली असतानाच आता आणखी ११४ विशेष फेऱ्या सोडण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. १५ आॅगस्टनिमित्त मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केलेल्या भाषणात प्रवाशांसाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधांबाबत माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षी याच कालावधीत ३ हजार ८१४ कोटी रुपयांच्या अंदाजित उत्पन्नाच्या तुलनेत १३ टक्के वाढ होत या चालू आर्थिक वर्षात ४ हजार ३२२ कोटी रुपये इतके अंदाजित उत्पन्न प्राप्त झाले असल्याचे सूद यांनी सांगितले. या वर्षी ४३४ हॉलिडे स्पेशल ट्रेन चालवण्यात आल्या. तर विविध गाड्यांना सर्व श्रेणीतले १ हजार २३८ तात्पुरते डबे जोडण्यात आले. गणेशोत्सवासाठी ६0 विशेष फेऱ्या सोडण्यात येणार असून आणखी ११४ विशेष फेऱ्या चालवण्यात येणार असल्याचे सूद म्हणाले. नाशिक रोड व भुसावळदरम्यान तर नाशिक रोड ते इटारसीदरम्यान रोज एक विशेष अनारक्षित गाडी चालवण्याचे नियोजन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गणेशोत्सवासाठी आणखी ११४ विशेष फेऱ्या
By admin | Published: August 17, 2015 1:16 AM